देगलूर, गंगाधर मठवाले| तालुक्यातील शहापूर जिल्हा परिषद गण हा मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव असल्याने आगामी निवडणुकीत या गणात राजकीय गणिते रंग घेत आहेत. स्थानिक काही इच्छुकांनी विविध पक्षांकडून उमेदवारीची मागणी केली असली, तरी “जनतेचा पाठिंबा मिळाला तरच निवडणूक लढवू, अन्यथा घरीच राहू — कारण खर्च करण्याची ताकद नाही,” अशी भूमिका काही संभाव्य उमेदवारांनी घेतल्याचे समजते.


या पार्श्वभूमीवर ‘आयात’ उमेदवाराची लॉटरी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक पातळीवर उमेदवार ठरवण्यात अडचणी येत असल्याने विविध पक्षांनी बाहेरून उमेदवार आणण्याची चाचपणी सुरू केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसकडून नदूर येथील एका इच्छुकाचे नाव चर्चेत आहे. भाजपकडून तमलूर येथील बँकेच्या सौभाग्यवतींचे नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे चिरंजीव मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत.


सध्या प्रत्येक पक्षाकडून एकेक नाव चर्चेत असले तरी “आमच्या शिवाय दुसरा पर्याय नाही” अशा आत्मविश्वासात (किंवा भ्रमात) हे उमेदवार वावरत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आर्थिक बाजूवर प्रश्नचिन्ह असल्याने काहींचा आत्मविश्वास डळमळतो आहे.

काही उमेदवारांकडे कोट्यवधींची मालमत्ता असूनही “आमच्याकडे खर्चाची ताकद नाही” अशी नम्र भूमिका घेतल्याचे दिसून येते. स्थानिक मतदारांमध्ये यावर चर्चा रंगली असून “खर्च करणाऱ्याचंच पारडं जड होतं, तो कोणत्याही पक्षाचा असो” असा सूर ऐकू येतो.
दरम्यान, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस वगळता भाजपचा स्थानिक उमेदवार डमी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र जर भाजपने माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश बातनाते किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी दिली, तर संपूर्ण समीकरण बदलण्याची शक्यता असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.
काँग्रेसच्या संभाव्य उमेदवाराची जनतेत ओळख कमी असल्याने, ‘आयात’ उमेदवारानेच बाजी मारली तर? हा प्रश्न सध्या मतदारांमध्ये चर्चेचा प्रमुख विषय ठरला आहे.


