Thursday, May 14

सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी करुनच वापरावे – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे -NNL

नांदेड| येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरणीसाठी सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता चाचणी करुनच बियाणे वापरावे. तसेच स्वत:कडे उपलब्ध असलेले चांगले बियाणे उपयोगात आणावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पिक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणीत बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील दोन वर्षापर्यंत वापरता येते. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल. मागील दोन वर्षात शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित झालेले सोयाबीन बियाणे चालू वर्षी बियाणे म्हणून शेतकरी पेरणीसाठी वापरू शकतात. तसेच ग्रामबीजोत्पादन, पिक प्रात्याक्षिके योजना अंतर्गत आलेल्या उत्पन्नातून बियाण्यांची निवड करता येते.

प्रमाणीत बियाण्यांपासून आलेल्या उत्पादनातून चाळणी करून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची बियाणे म्हणून निवड करावी. सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजूक असून त्याचे बाह्य आवरण पातळ असते त्यामुळे त्याची उगवणक्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळताना काळजी घ्यावी. बियाण्याची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण 10 ते 12 टक्क्यापेक्षा जास्त नसावे. साठवणुकीसाठी प्लास्टिक पोत्यांचा वापर करू नये. बियाणे साठवताना त्याची त्याची थप्पी 7 फुटापेक्षा जास्त उंच असणार नाही याची काळजी घ्यावी. बियाणे हाताळताना जास्त प्रमाणात आदळआपट होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रती हेक्टरी बियाणे दर 75 किलोवरून 50 ते 55 किलोवर आणण्यासाठी टोकन पदधतीने किंवा प्लॉनटरचा वापर करून पेरणी करावी. सोयाबीन उगवणक्षमता 70 टक्केपेक्षा कमी असल्यास उगवनक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे. मार्केट मधील बियाणे खरेदी केलेल्या केलेल्या बॅग मधील प्रतिनिधीक स्वरुपातील बियाणाची उगवणक्षमता तपासुनच पेरणी करावी.

75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी. बियाण्याची पेरणी 3 ते 4 सेंटीमीटर खोलीपर्यंत करावी. पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगापासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. रायझोबियम व पीएसबी जीवाणू संवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रती 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी ३ तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे व नंतर त्याची पेरणी करावी, असे कृषि विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!