नांदेड | अतिवृष्टी व पूरामुळे नांदेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके, घरे, जनावरे वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी नीळा, आलेगाव, एकदरा, भालकी, चिखली बु., पासदगाव, पुयनी आदी आपद्ग्रस्त गावांना भेट देऊन शेतकऱ्यांना धीर दिला. शासनामार्फत जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.


यावेळी बोलताना चव्हाण यांनी पीकविमा कंपन्यांच्या धोरणाबद्दल नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांना योग्य परतावा न मिळाल्याने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून सुधारणा घडवून आणण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.



दरम्यान, नांदेड तालुका भाजपच्यावतीने पाच शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात आली. निळा गावातील तुकाराम जोगदंड यांना घर पडल्यामुळे २० हजार रुपयांची मदत देण्यात आली. तर आलेगाव आणि एकदरा येथील चार शेतकऱ्यांना जनावरे दगावल्याने प्रत्येकी ७ हजार रुपयांची मदत करण्यात आली. या मदतीमुळे शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढले असून, शेतकऱ्यांच्या समस्यांवर तातडीने तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





