Wednesday, May 13

आचारसंहिता संपली; शिधापत्रिकाधारक कुटुंबाला साडी वाटप करण्याची मागणी -NNL

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाला प्रत्येकी एक साडी मोफत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार तालुक्यात उपलब्ध झालेल्या साड्यांचे वाटप रेशनदुकानदारांकडून सुरू होते. अशातच आचारसंहिता लागू झाल्याने अर्धावर साडीचे वितरण थांबविण्यात आले होते. निवडणुका संपल्या. आचारसंहितासुद्धा संपली. मात्र, अद्यापही साडी वाटपाला मुहूर्त सापडला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांचे लक्ष मुहूर्ताकडे लागले आहे.

शासन निर्णयानुसार अंत्योदय शिधापत्रिकावर प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी रेशन दुकानावर मोफत वितरित करण्यात येणार होती. होळीच्या सणापर्यंत या साडीचे वितरण करण्याचे नियोजन होते. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे साडी वाटपाला ब्रेक लागला. साखर, तेल, रवा, चणा डाळ, मैदा, पोहे आदींचा समावेश असलेल्या आनंदाचा शिधासोबत अंत्योदय रेशनकार्डधारक कुटुंबांना यावर्षी साडीदेखील वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बऱ्याच ठिकाणी साडीचे वाटप झाले.

मात्र, आचारसंहिता लागण्यापूर्वी साडीचे वाटप झाले नाही. रेशन दुकानात साड्या आल्या व वाटप सूरू होते, त्यावेळी आचारसंहिता लागू झाली होती. त्यामुळे परिसरातील रेशन दुकानदाराला साडीचे वाटप करता आले नाही. त्यामुळे त्या साड्या दुकानात तशाच पडून आहेत. निवडणुका संपली असूनसुद्धा अद्यापपर्यंतही पात्र लाभार्थ्यांना साडीचे वाटप करण्यात आले नसल्याने लाभार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. साडीचे वाटप केव्हा होणार, मुहूर्त केव्हा निघणार, अशी विचारणा लाभार्थी संबंधिताकडे करताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!