नांदेड| ग्रामीण हद्दीतील पद्मजा सिटी येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडने तीन सराईत आरोपींना जेरबंद केले. या आरोपींकडून नगदी 11,37,000 रुपये, सोन्याचे अंदाजे 145 तोळे दागिने (किंमत 16,63,000 रुपये) तसेच ब्रिझा कार असा एकूण 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


ही कारवाई अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली तर उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड) यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मिलींद सोनकांबळे व त्यांच्या पथकाने केली.

यातील आरोपी शेख शफी उर्फ शफी बिल्डर (रा. उमर कॉलनी, नांदेड), शेख अमेर उर्फ एडी अम्मू (रा. घरकुल, गोवर्धन घाट, नांदेड), नंदकिशोर वामन देवसरकर (रा. देवसरी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) यांना अटक करण्यात आली असून, आरोपींनी कबुली देताना, त्यांनी पद्मजा सिटीतील घरफोडी नियोजनबद्ध पद्धतीने केल्याचे सांगितले. तसेच चोरीतील काही दागिने निजामाबाद येथील ज्वेलर्स दुकानात विक्री केल्याचेही उघड झाले आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी पथकाचे कौतुक केले आहे.



