कंधार, सचिन मोरे| कंधार तालुक्यातील जेष्ठ समाजसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष रामचंद्र येईलवाड यांना ओबीसी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नांदेड येथील विसावा हॉटेलमध्ये ७ सप्टेंबर रोजी भारतीय पिछडा शोषित संघटना, नांदेड तर्फे मंडळ जयंती निमित्त सकल ओबीसी समाज जिल्हा नांदेडच्यावतीने हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.


येईलवाड हे कैलासवासी माजी खासदार शरद जोशी यांचे एका काळचे कट्टर समर्थ त्यांच्या कार्याची सुरुवात शेतकरी संघटनेच्या माध्यमातून झाली. शेतकरी संघटनेची जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशा विविध पदावर त्यांनी कंधार तालुक्यात यशस्वी कामगिरी बजावली आहे. शेतकऱ्यांच्या अनेक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. राज्यातील ओबीसी समाजातील, बलुतेदार व अठरा पगड जाती तसेच भटक्या समाजातील समाज घटकांना एकत्र आणून संघटित करण्यासाठी येईलवाड यांनी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न केलेले आहेत.


त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना ओबीसी भूषण हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. याबद्दल त्यांचा कंधार पत्रकारांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार हफीज घडीवाला, सचिन मोरे, हाजी म. अन्सारोद्दीन, बाबूखान पठाण, मुरलीधर थोटे, संतोष कांबळे, माधव गोटामवाड आदी उपस्थित होते.



