Mla Prataprao Patil ; पाच वेळा पक्षांतर तरीदेखील जनतेच्या आशीर्वादामुळेच आमदार – आमदार प्रताप चिखलीकर

कंधार, सचिन मोरे। मी माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय वाटचालीमध्ये अनेक निवडणुका लढवल्या अनेक वेळेस जिंकलो तर काही वेळेस पराभव देखील पत्कारला. माझे वडील काही आमदार खासदार नव्हते तरीदेखील लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील गरीब कष्टकरी जनता माझ्या पाठीशी सातत्याने खंबीरपणे उभी राहिली. मतदारसंघाच्या विकासासाठी व काही राजकीय अडचणीमुळे मला वारंवार पक्ष बदलावे लागले तरीदेखील जनतेचे माझ्यावरील प्रेम कमी झाले नाही. त्यांच्या प्रेमामुळेच तीन वेळेस आमदार, एक वेळेस खासदार म्हणून यशस्वी कामगिरी बजावू शकलो. असे भावनिक उद्गार आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काढले.



तालुक्यातील गंगनबीड येथे संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष संदीप पाटील तोंडचिरे यांच्या वतीने शेतकरी सन्मान सोहळ्याचे व मेळाव्याचे भव्य आयोजन दि २८ जुन रोजी सायंकाळी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा.पुरुषोत्तम धोंडगे, प्रमुख मार्गदर्शक कृषिरत्न पुरस्कार प्राप्त गणेश फरताडे, युवा नेते स्वप्निल पा लुंगारे,मनोहर पाटील भोसीकर, माजी प्राचार्य किशनराव डफडे, शिवसेनेचे परमेश्वर जाधव, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील जाधव,मधुकर पाटील डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी गावकऱ्यांच्या वतीने व मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने आमदार चिखलीकर यांचा मानचिन्ह पुस्तक,शाल देऊन भव्य सत्कार करण्यात आला.


सत्कारास उत्तर देताना आमदार चिखलीकर म्हणाले “शेतकऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे ही आघाडी सरकारची भूमिका असून शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान योजना काढली तर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची भूमिका घेतली. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे त्याच्या शेतमालाला रास्त भाव मिळवा ही माजी खासदार कै. शरद जोशी यांची भूमिका होती शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी जोशी यांनी मोठी चळवळ उभी केली होती.


सर्वत्र वन्य प्राण्याचा उपद्रव्य मोठ्या प्रमाणात वाढला असून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्याच्या शेतीला कुंपण करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत द्यावी. अशी मागणी विधानसभेत करणार असल्याचे सांगितले. संभाजी ब्रिगेड ने शेतकरी सन्मान सोहळा व मेळावा घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत गंगनबीडच्या पुलाचा प्रश्न तात्काळ सोडवणार व समशानभूमीसाठी भरीव निधी देणार असल्याचे आश्वासित केले या कार्यक्रमास पंचक्रोशीतील हजारोचा जन समुदाय उपस्थित होता.




