
हिमायतनगर,अनिल मादसवार| डोल्हारी येथील शेतकऱ्याच्या शेतातील जमा केलेल्या हरभऱ्याच्या ढीगाऱ्याला कुणीतरी अज्ञाताने आग लावली आहे. हि घटना दिनांक १२ फेब्रुवारी बुधवार रात्री १ वाजेच्या दरम्यान घडली असून, यास्त शेतकरी दिनेश पांडुरंग कदम यांचे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. जाणीवपूर्वक गंजीला आग लावून नुकसान करणाऱ्यांचा शोध घेऊन न्याय द्यावा अशी मागणी पोलिसाकडे तक्रार देऊन करणार असल्याचे शेतकऱ्याने नांदेड न्यूज लाइव्हशि बोलताना सांगितले आहे.


हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावर असलेल्या मौजे डोल्हारी ता. हिमायतनगर जि. नांदेड येथील शेतकरी दिनेश पांडुरंग कदम यांनी नुकताच शेतातील दोन एकर रानातील हरभरा काढून ढग लावला होता. हार्वेस्टर मशीन आल्यानंतर चणा काढण्याची वाट शेतकरी पाहत होता. दरम्यान शेतातील हरभऱ्याचा जमा केलेल्या ढगाला दिनांक १२ फेब्रुवारी बुधवार रात्री १ वाजेच्या दरम्यान कुणीतरी अज्ञाताने जाणीवपुर्वक आग लावून गंजी जाळून टाकली आहे. यामुळे शेतकऱ्याचे जवळपास २० ते २५ क्विंटल होणारा हरभरा जळून खाक झाला आहे. या घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे ०१ लक्ष ५० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.

बहुतांश शेतकरी बांधव भविष्याचा विचार करत शेतातील पिकाची लागवड करून घाम गाळून लहान मुलाप्रमाणे जपणूक करतात. जेंव्हा हाताशी आलेला पिकावर पुढील नियोजनाची तयारी केली जाते. त्याचे वेळी कधी अस्मानी संकट उभे राहते. मात्र येथील शेतकऱ्यावर कोणतरी विघ्नसंतोषी व्यक्तीने हरभऱ्याचा गंजीला आग लावून तोंडचा घास हिरावला गेला आहे. तालुक्यात घडत असलेल्या या घटनेवरून माणसाची वृत्ती कोणत्या थराला गेली हे दिसत आहे. अश्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून शेतकऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. एकूणच या घटनेने शेतकऱ्याचे नुकसान होईल भविष्याचे स्वप्न भंगले आहे. अश्या यास कारणीभूत असलेल्याचा शोध घेऊन त्यांना अद्दल घडवली पाहिजे अशी प्रतिक्रिया परिसरातील शेतकरी नागरिक बोलून दाखवीत आहेत.





