नांदेड | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील औषधनिर्माणशास्त्र संकुलामध्ये दि. २१ ते २६ ऑक्टोबर, दरम्यान पीएम-उषा योजनेअंतर्गत ‘कंप्युटर-एडेड ड्रग डिझायनिंग’ या विषयावर एक आठवडाभर चालणारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस राज्यभरातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील पदव्युत्तर, संशोधक विद्यार्थी विशेषतः छत्रपती संभाजीनगर, कराड, अमरावती, लातूर आणि नांदेड येथील संशोधक, विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संखेने सहभागी झाले होते.
ख्यातनाम संशोधक बंगलोर, मुंबई, नागपूर, नगर आणि शिरपूर येथून मार्गदर्शनासाठी उपस्थित होते. त्यांनी सहभागींना संगणक-विषयी औषध संशोधनातील नवीनतम तंत्रज्ञान आणि साधनांबद्दल मार्गदर्शन केले. समन्वयक डॉ. संतोष बुटले यांनी कार्यशाळेची उद्दिष्टे स्पष्ट केली आणि औषध शोधण्याच्या प्रक्रियेत संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रशिक्षण यांच्या महत्त्वावर भर दिला. प्रमुख पाहुणे डॉ. एस.सी. ढवळे यांनी आपल्या भाषणात संगणक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे उज्ज्वल भविष्य स्पष्ट केले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी असलेले डॉ. एस.एस. पेकमवार यांनी सर्व सहभागींना या कार्यशाळेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले.
एनएमआयएमएस मुंबई विद्यापीठाचे डॉ. महेश पालकर यांनी ‘मॉलिक्युलर मॉडेलिंग साधनांचा औषध संशोधनात महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. आणि मॉल्ग्रो व्हर्च्युअल डॉकिंग सॉफ्टवेअरचा प्रत्यक्ष वापर करून दाखवला. त्यानंतर, शिरपूर येथील आर सी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एजुकेशन अँड रिसर्च चे डॉ. हरून पटेल यांनी फ्रॅगमेंट-बेस्ड ड्रग डिझाइनिंग या विषयावर मार्गदर्शन केले.
दुसऱ्या दिवशी अल्टेम टेक्नॉलॉजी बंगलोर चे तज्ञ डॉ. साक्षी भारद्वाज आणि कु. मारिया दा कोस्टा यांनी विद्यार्थ्यांना लिगँड-बेस्ड आणि स्ट्रक्चर-बेस्ड फार्माकोफोर मॉडेलिंगचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी फार्माकोफोर मॉडेल तयार करण्याच्या विविध पद्धतींचे सखोल प्रशिक्षण दिले. तिसऱ्या दिवशी सहभागींना बायोविया डिस्कव्हरी स्टुडियो सॉफ्टवेअर वापरून ‘मॉलेक्युलर डायनॅमिक्स सिम्युलेशन’ कसे करावे याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच डेन्सिटी फंक्शनल थिअरी (डीएफटी) च्या सहाय्याने बंधन ऊर्जा विश्लेषणाचे सत्रही आयोजित करण्यात आले.
चौथ्या दिवशी विद्यार्थ्यांनी एडीएमईटी तपासणी, प्रोटीन-प्रोटीन डॉकिंग आणि इतर महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल प्रशिक्षण घेतले. विविध डेटाबेस वापरून संयुगे शोधण्याचे मार्गदर्शनही यावेळी देण्यात आले. कार्यशाळेच्या पाचव्या दिवशी ‘स्वारातीम’ विद्यापीठातील डॉ. संतोष बुटले यांनी व्हर्च्युअल स्क्रीनिंग डेटाबेस आणि साधनांबद्दल मार्गदर्शन केले. यामध्ये झीन्क-१५, ड्रग बँक आणि सीएचइएमबीएल सारख्या डेटाबेसचे उपयोग तसेच PASS, मॉलिन्स्पिरेशन आणि प्री एडीएमईटी सॉफ्टवेअरचे उपयोग शिकवण्यात आले. डॉ. चंदन दिपके यांनी होमोलॉजी मॉडेलिंग या विषयावर हँड्स-ऑन सत्र आयोजित केले.
दि. २६ ऑक्टोबर रोजी गुरुनानक कॉलेज ऑफ फार्मसी, नागपूरचे डॉ. सुमित अरोरा यांनी ऑटोडॉक विना आणि चिमेरा सॉफ्टवेअरसाठी व्यावहारिक प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेमुळे उपस्थितांना औषध निर्मिती प्रक्रियेतील आधुनिक संगणकीय साधनांचा प्रभावी वापर करण्याची क्षमता प्राप्त झाली.
कार्यशाळेचा समारोप समारंभ औषधनिर्माणशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. एस. एस. पेकमवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. ‘स्वारातीम’ विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी. डी. पवार आणि गुरू नानक कॉलेज ऑफ फार्मसीचे डॉ. सुमित अरोरा यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली. डॉ. डी. डी. पवार यांनी अशा कार्यशाळांची अत्यंत महत्त्वाची गरज अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की, या कार्यशाळांमुळे विद्यापीठाला आधुनिक ज्ञान आणि तंत्रज्ञानाची झलक मिळेल आणि देशाचा विकास होण्यास मदत होईल. या कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांना नवीन संशोधन क्षेत्रांची माहिती मिळेल आणि त्यांना आपल्या करिअरची दिशा निश्चित करण्यास मदत होईल.
समारोप सत्रात सहभागींनी कार्यशाळेबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली. विशेषत: प्रात्यक्षिक सत्रांमुळे त्यांना (सीएडीडी) बद्दलच्या सुरुवातीच्या भीतीवर मात करण्यास मदत झाली. आणि महत्त्वपूर्ण प्रत्यक्ष अनुभव मिळाला. औषध शोध क्षेत्रातील अनेक प्रगत साधने आणि तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळाल्याबद्दल सहभागींनी विद्यापीठ आणि औषधनिर्माणशास्त्र संकुलाच्या आयोजन समितीचे आभार मानले. या यशस्वी कार्यशाळेसाठी कार्यशाळेचे समन्वयक डॉ. एस. आर. बुटले, श्री. राहुल चौधरी आणि स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी केलेल्या अथक परिश्रमाबद्दल डॉ. एस.एस. पेकमवार यांनी कौतुक केले. या कार्यशाळेच्या आयोजनात पीएम-उषा योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल ‘स्वारातीम’ विद्यापीठाचे पीएम-उषा समन्वयक प्रा. टी. ए. कदम यांचे विशेष आभार मानण्यात आले. डॉ. गट्टानी, डॉ. वाढेर, डॉ. ढवळे, डॉ. क्षीरसागर, डॉ. पटवेकर, डॉ. मून, डॉ. कल्याणकर, डॉ. घोळवे, डॉ. कराळे, श्री. मनुरे, कु. शेळके, कु.कल्याणकर, कु कदम, कु म्हस्के, कु माने, कु. आळने, कु मोरे आणि संकुलातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या कार्यशाळेच्या यशासाठी मिळून काम केल्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले. कार्यशाळा सुरळीत आणि फलदायी पार पडल्याबद्दल कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीचे विशेष कौतुक केले.
कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी जाहीर केले की, रुसा, पीएम-उषा आणि महाराष्ट्र शासनाच्या अनुदानांतर्गत केंद्रीय उपकरण केंद्र (सीआयसीएमआरआय) येथे स्थापन केलेल्या अत्याधुनिक संशोधन सुविधांचा लाभ इतर विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील संशोधक, प्राध्यापक आणि उद्योगांना घेता येईल. या सुविधांमध्ये बायोविया ड्रग डिस्कव्हरी स्टुडियो, एचआर-एलसीएमएस, जीसीएमएस, एफइएसइएम, एएएस, रॅमन स्पेक्ट्रो फोटोमीटरने आणि रेफरॅक्टोमीटर यांसारखी प्रगत उपकरणे समाविष्ट आहेत. नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य विभागाचे संचालक डॉ. एस. जे. वाढेर यांनी शैक्षणिक आणि औद्योगिक संशोधकांना या अत्याधुनिक संशोधन सुविधाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. त्यांनी संशोधन क्षमता अधिक वृद्धिंगत करण्यासाठी भविष्यात विशिष्ट उपकरणांवर केंद्रित कार्यशाळांचे आयोजन करण्याचे संकेत दिले.