हिमायतनगर, अनिल मादसवार| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट नांदेड उत्तर मधील पदाधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण जिल्हास्तरीय बैठक दि. १८ शुक्रवारी हिमायतनगर येथे संपन्न झाली. दोन तास चाललेल्या या बैठकीत निवडणुकीच्या उमेदवाराकडून सन्मानाची वागणूक मिळत नसल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तर जिलाध्यक्ष पवार यांच्या विरोधात प्रचंड नाराजीचा सूर उमटला आहे. एकूणच आगामी निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराने घटक पक्षाला डावलले तर हि निवडणूक त्यांना महागात पडणार असल्याचे बैठकीतील विचारमंथन चर्चेतून समोर आले आहे.
हिमायतनगर शहरातील भैय्या बंडेवार यांच्या फार्महाउस येथील श्री साईबाबा मंदिर सभागृहात दि. १८ शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातील पदाधिकारी यांची जिल्हास्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात विचार मंथन करण्यात आले असून, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष विश्वांबर पवार यांच्या बाबतीत मात्र या बैठकीत नाराजीचा सुर उमटलेला पहावयास मिळाला आहे. जिल्हय़ातील उत्तर विभागातील सगळ्याच तालूका अध्यक्षांनी पवार यांच्या बाबतीत नाराजी व्यक्त केली असून, जिल्हाध्यक्ष हटावचा नाराच या बैठकी दरम्यान देण्यात आला. विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी अजित पवार गटांमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाटय़ावर आली आहे. सदर बैठक हिमायतनगरचे तालुकाध्यक्ष अभिषेक लूटे यांनी घडवून आणून अप्रत्यक्ष रित्या जिल्हाध्यक्ष बदलाचा एक प्रकारे ठरावाच त्यांच्या माध्यमातून घडून आणला गेला असे म्हटल्या जात आहे.
कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यात समन्वय असायला हवे यासाठी हि बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत उपस्थित विविध तालुक्याच्या अध्यक्षांनी लोकसभा निवडणुकीतील अनुभव आणि आगामी विधानसभा निवडणुकीबाबतचीआपली भुमिका मांडली. या प्रसंगी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत सुगावे पाटील म्हणाले की, आपण सर्वानी एकदिलाने काम करावे. आपली जी काही अडचण आहे ती वरिष्ठांशी सांगून सोडवण्याचा प्रयत्न करू, जिल्हाध्यक्ष यांच्या बाबतीची नाराजी दुर करण्यासाठी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कानावर विषय टाकू तसेच अजित दादांची भेट घेऊ. गेल्या लोकसभा निवडणुकीत आम्ही युतीधर्म पाळून महायुतीच्या उमेदवाराचे प्रामाणिक काम केले. परंतू आम्हाला विश्वासात न घेता आमच्या सोबत दुजाभाव केला जात आहे. पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही ही बाब ही चर्चेतून सोडवू असे त्यांनी सांगितले.
आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वानी आप आपसातील अंतर्गत मतभेद बाजूल सारून महा युतीच्या उमेदवाराचे काम करूण उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे हात बळकट करावेत. असे अवाहन वसंत सुगावे पाटील यांनी केले. नांदेड महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते जिवन घोगरे पाटील यांनी ही आपल्या मनोगतातुन महायुतीचा उमेदवार हा अजित दादाच्या विचारांचा उमेदवार म्हणून त्याचे काम आपण करून युती धर्म पाळण्यासाठी प्रयत्न करावे असे अवाहन केले. हि बैठक प्रदेश सरचिटणीस विक्रम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील, नांदेड शहराध्यक्ष जीवन पाटील घोगरे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष आनंदराव डांगे, किनवट माहूर विधानसभा अध्यक्ष वैजनाथ करपुडे पाटील, हदगाव विधानसभा अध्यक्ष एकनाथ जाधव, अर्धापूर तालुकाध्यक्ष राशी पाटील, मुदखेड तालुकाध्यक्ष आनंद टिपरसें, भोकर तालुकाध्यक्ष राजेश देशमुख, माहूर तालुकाध्यक्ष अमित राठोड, किनवट तालुकाध्यक्ष संजय सिडाम, हदगाव अमोल पाटील कदम, हिमायतनगर अभिषेक लुटे आदींसह अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.