नांदेड | भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार नांदेड जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट अंदाज आहे. नांदेड जिल्ह्यात सध्या खरीप पिकांचा काढणी हंगाम मोठया प्रमाणावर सुरु आहे. संभाव्य पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या काढणी पश्चात नुकसान या घटकांतर्गत विमा कंपनीस 72 तासाच्या आत नुकसानीची पूर्वसूचना कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
अधिसूचित क्षेत्रातील शेतात पिक कापणी करून सुकवणीसाठी पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांसाठी कापणी पासून जास्तीत जास्त दोन आठवड्यापर्यंत (14 दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस व अवकाळी पावसापासून नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येईल. नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरून क्रॉप इन्शुरन्स हे ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरावी किंवा टोल फ्री क्रमांक 14447 याद्वारे विमा कंपनीस नुकसानीची पूर्वसूचना द्यावी. पूर्वसूचना दिल्यानंतर विमा कंपनीमार्फत किंवा केंद्र शासनामार्फत प्राप्त झालेला डॉकेट आयडी सांभाळून ठेवावा. क्रॉप इन्शुरन्स ॲप मध्ये पूर्वसूचना देताना अतिवृष्टी, जास्तीचा पाऊस या कारणांचीच निवड करावयाची आहे, इतर कारणे नमूद करू नये असेही कृषी विभागाने कळविले आहे.
तथापि काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी वरील माध्यमांद्वारे विमा कंपनीस पूर्व सूचना देऊ न शकल्यास तालुका प्रतिनिधी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयास किंवा आपल्या गावातील संबंधित कृषि सहाय्यक, तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्याकडे ऑफलाईन अर्ज सादर करावा, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.