हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावर असलेल्या मौजे रेणापूर बेचिराख शिवारात शार्टसर्किट होवून पाच एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला असून, महा वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे या शेतकर्याचे अंदाजित 7 लाखाचे नुकसान झाले आहे. हि घटना दि. १६ शनिवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडली असून, महावितरण कंपनीने तात्काळ नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्याला दिसला द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
हिमायतनगर तालुक्यात महावितरण कंपनीचा मनमानी कारभार सुरूच असून, मागील आठ दिवसापूर्वी नदीकाठावरील एकंबा गावाजवळील एका शेतकऱ्याच्या शेतातील ऊस जाळून मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर आज दिनांक १६ शनिवारी दुपारी १२ वाजता वीजतारामध्ये शॉर्टसर्किट होऊन नदीकाठावरील रेणापूर बेचिराख येथील शेत सर्वे नंबर ८४ मधील बोरी येथील शेतकरी विकास नामदेवराव माने यांचा ५ एकरातील ऊस जाळून खाक झाला आहे.
पैनगंगा नदीकाठावरील शेतकऱ्याने गतवर्षी ऑगस्ट महिन्यात उसाची लागवड केली होती. यास १४ महिने लोटले असताना अद्यापही कारखान्याने ऊस नेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत होता, दरम्यान शनिवारी दुपारी लागवड केलेल्या उसांपैकी पाच एकरातील ऊसाला महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शार्टसर्किट होवून आग लागली. यात पाच एकर ऊस जळून खाक झाला असून माने यांचे जवळपास ७ लक्ष रूपयाचे नुकसान झाले आहे.
याच आठवड्यातील ही दुसरी घटना असून, वारंवार अश्या घटना घडत असतांनाही महावितरण कंपनीला जाग येत नसल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे. महावितरण कंपनीच्याच दुर्लक्षामुळे अश्या घटना घडत असून, प्रभारी उपकार्यकारी अभियंता भडंगे यांनी कार्यालयाला न थांबता पलायन केले असल्याची चर्चा कार्यालयासमोर होत होती. तर लाईनमन कर्मचाऱ्यास विचारणा केली असता ते दुसऱ्याकडे चार्ज देऊन सुट्टीवर निघून गेल्याचे सांगण्यात आले आहे. एकूणच हिमायतनगर तालुक्यावर राजकीय नेत्यांची वाचक राहिली नसल्याने महावितरण कंपनीचा मनमानी कारभार सुरु आहे.
तालुक्यातील पळसपूर, सिरपल्ली, एकंबा आदी भागात तर चक्क महावितरण अधिकारी, कर्मचारी पैसे दिल्या घेतल्याशिवाय कामच करत नसल्याची ओरड सोशल मीडियावर होऊ लागली आहे. याकडे महावितरणचे अधीक्षक अभियंत्यांनी लक्ष देऊन हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील अधिकारी लाईनमन कर्मचाऱ्याकडून चालविल्या जात असलेल्या एकाधिकार शाही कारभाराची अचानकपणे उच्चस्तरीय समितीला पाठवून प्रत्यक्ष ग्रामीण भागात जाऊन चौकशी केल्यास महावितरण विभागाच्या कारभाराचे पितळे उघडे पडतील असे त्रस्त नागरिक, शेतकरी बोलून दाखवीत आहेत.