लोहा/नांदेड| नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात एक मोठी अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यात आली आहे. धर्मापुरी तांडा (मजरे) शिवारात पोलिसांनी छापा टाकून सुमारे १८२ किलो ७०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या गांजाची अंदाजे किंमत ९ लाख १३ हजार ५०० रुपये असून, यात वापरण्यात आलेले बोलेरो वाहन (क्र. एम एच ४६ ए.पी. २०६७) देखील जप्त करण्यात आले आहे, ज्याची किंमत ५ लाख रुपये आहे. एकूण १४ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत हस्तगत करण्यात आला आहे.ही कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखाचे सहायक पोलीस निरीक्षक रविकुमार वाहुळे व पथकाने केली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडण्याची ही पहिलीच वेळ होय.


याप्रकरणी माधव विठ्ठल जाधव (वय ३९, व्यवसाय शेती, रा. धर्मापुरी तांडा, ता. कंधार) आणि अशोक मरीबा वाघमारे (वय ३०, व्यवसाय चालक, रा. भोसी रोड, कंधार) या दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोकांना गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने त्याची वाहतूक करत असताना रंगेहात पकडले गेले.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १३ जून २०२५ रोजी दुपारी २.३७ वाजता धर्मापुरी फाटा ते नयधरवाडीकडे जाणाऱ्या कच्च्या शिवरस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनाचा मालक माधव गोरे (रा. सुजलेगाव, ता. नायगाव) हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, कंधार उप विभागीय पोलीस अधिकारी, डॉ अश्विनी जगताप, कंधार स्थागुशा पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशा सहायक पोलिस निरीक्षक रविकुमार वाहुळे, याच्या पथकाने ही मोठीं कार्यवाही केली. पीएसआय बळीराम दासरे, पो. उपनिरीक्षक के. सी. बेंबडे, (पोलीस ठाणे देगलुर) स्थागुशा, नांदेडचे सपोउपनि गुंडेराव करले, विठ्ठल शेळके, पोकों/ देविदास चव्हाण, मोतीराम पवार, चालक सिध्दार्थ सोनसळे पोलीस ठाणे लोहा येथील अधिकारी व अमंलदार कार्यवाहीत होते.
