मुखेड, रणजित जामखेडकर| बेकायदेशीररित्या कामावरुन कमी केलेल्या कामगारांना कामावर पुर्ववत घ्यावे, औद्योगीक न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे या मागण्यांसाठी शासकीय औद्योगिक कामगार संघटनेच्यावतीने मुखेड येथील सामाजिक वनीकरण कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून कायम रोजंदारीवर काम करणार्या काही कामगारांनी कायम सेवेत सामावून घ्यावे यासाठी मा.औद्योगिक न्यायालयात धाव घेवून जैसे थे आदेश मिळवले आहेत. औद्योगिक न्यायालयात गेल्याचा राग मनात धरुन काही कामगारांना वनपरिक्षेत्र अधिकार्यांनी बेकायदेशीररित्या न्यायालयीन आदेश असतांनाही कामावरुन कमी केले आहे.
त्या जागी कमी रोजंदारीत नवीन कामगारांची भरती करुन कामगार कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचे शासकीय औद्योगिक कामगार संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. बेकायदेशिररित्या कामावरुन कमी केलेल्या कामगारांना तात्काळ कामावर घ्यावे या मागणीसाठी संबंधीत कामगारांनी मुखेड येथील सामाजिक वनीकरण कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे.
शासकीय औद्योगिक कामगार संघटना जिल्हाध्यक्ष कॉ.प्रदीप नागापूरकर, जिल्हा उपाध्यक्ष कॉ.अब्दुल गफार, जिल्हा कार्याध्यक्ष कॉ.शिवाजी फुलवळे, यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. आंदोलनात माधव जाधव, लक्ष्मण नालापल्ले, रुपला जाधव, बळी तिडके, मारुती गायकवाड, बालाजी जाधव, संजय जाधव, अनिल जाधव, गजानन जाधव त्याचबरोबर पाठिंबा देण्यासाठी अनेक कामगार उपस्थित होते.