नांदेड/हिमायतनगर (प्रतिनिधी) हिमायतनगर भाजपाचे माजी तालुका सरचिटणीस व आमदार बाबुराव कदम यांचे विश्वासू कट्टर समर्थक वामनराव पाटील वडगावकर यांनी भाजपाला रामराम ठोकत व आमदार कोहळीकर यांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजितदादा पवार गटात) जाहिर प्रवेश केला आहे.


हा प्रवेश आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष एकनाथ पाटील जाधव, तालुकाध्यक्ष अभिषेक लुटे यांच्या मार्गदर्शनाखाली वामनराव पाटील वडगावकर यांनी पक्षाचा झेंडा स्वीकारला.



याचसोबत अभिलाष जयस्वाल, उबाठा गटाचे अमोल धुमाळे, प्रहारचे कार्यकर्ते संतोष टोकलवार, गणेशराव पाटील विरसनीकर, दत्तरामजी माने चाथारीकर, शरदचंद्र पवार गटाचे आकाश सूर्यवंशी आदीसह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेशितांचे स्वागत करताना आमदार चिखलीकर यांनी सर्वांना शुभेच्छा देत“पक्षवाढीसाठी जोमाने काम करा आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्या,” अशा सूचना दिल्या. यावेळी माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे, माजी आमदार अविनाश घाटे, भोकर पंचायत समितीचे उपसभापती सुरेश बिल्लेवाड, अर्धापूर पंचायत समितीचे हेंद्रे मामा, हादगाव ते तालुकाध्यक्ष निळू पाटील, अर्धापूर चे तालुकाध्यक्ष आत्माराम जी कपाटे, अर्धापूर चे शहराध्यक्ष साबिर शेख, भोकर चे परसराम पाटील, जिल्हा शहर सरचिटणीस प्रवीण घुले, विलास देशमुख यांची उपस्थिती होती.



या प्रवेशामुळे हिमायतनगर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद लक्षणीयरीत्या वाढणार असून, आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, ग्रामपंचायत व इतर स्थानिक निवडणूकीच्या पूर्वी राजकारणात नव्या घडामोडींना सुरूवात झाली आहे.

याबाबत वामनराव पाटील यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले की, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केला, आता खऱ्या अर्थाने हिमायतनगर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस वाढीला बळ मिळणार आहे. पक्षाच्या आदेशानुसार तालुक्यातील विविध वंचित भागातील समस्या सोडविण्यासह गावोगावी शाखा स्थापन करून पक्षाची बाजू भक्कम करणार असल्याचेही ते म्हणाले.


