नांदेड| दिवाळीच्या आनंदोत्सवात आसमंत उजळून टाकणाऱ्या आतषबाजीला यंदा महागाईचे ‘फटाके’ बसले आहेत. विविध प्रकारच्या फटाक्यांच्या किंमतीमध्ये सर्रासपणे ४० ते ५० टक्क्यांपर्यंतची मोठी वाढ झाली. त्यामुळे दिवाळीत फटाके खरेदी करताना सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसली आहे असे असतांनाही निवडणुका व दिवाळी सण लागून आल्याने येथील फटाका मार्केटमध्ये विक्रमी उलाढाल झाली परंतु फटाका मार्केट मध्ये सर्वच नियमांची पायमल्ली करत करोडो रुपयांच्या शासकीय महसूलाचीही लूट झाल्याची माहीती फटाक्याच्या होलसेल विक्रेत्याकडूनच प्राप्त झाली आहे.
दिवाळीच्या खरेदीसाठी यंदा फटाका मार्केट हे गर्दीने फुलले होते एकंदरीत दिवाळी सण व विधानसभा निवडणुका लक्षात घेता यंदा नागरिकांमधील उत्साह वाढून फटाक्यांची विक्री वाढून मोठी उलाढाल झाली आहे. परंतु बहती गंगा मे करोडो रुपयांचा शासकीय महसूलास हरताळ फासतांनाच फटाका असोशिएसनेने मार्केट मध्ये बसलेल्या व्यापाऱ्यांनाही लाखोंचा चुना लावला असल्याने व्यापाऱ्यांनी आपली बला ग्राहकांच्यावर टाकत मोठया प्रमाणात वसुल केली आहे.
फटाका विक्रिसाठीच्या सर्वच नियमांचे उल्लंघन…
विक्रीच्या ठिकाणी अग्निप्रतिबंधक उपाययोजना बंधनकारक आहे. अग्निशामक दलाच्या अटींमध्ये विक्रेत्याने २०० लिटर पाण्याचा साठा करणे आवश्यक आहे. असे असतांनाही या बाबींचे पालन झालेच नाही आणि फटाक्यांच्या दोन दुकानांमध्ये तीन मीटरपेक्षा कमी अंतर नसायला पाहीजे होते. तसेच आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था आवश्यक असतांनाही अनेक दुचाकी व चारचाकी गाड्यांचा फटाका मार्केटमध्ये मुक्त संचार होता. अशा प्रकारे वेगवेगळ्या नियमांचे बंधन घालण्यात आले होते तरी त्यांचे पालन होतांना दिसले नाही. हे सर्व घडत असतांना महापालिकेच्या फायर ब्रिगेडने एकही कारवाई केली नाही याचे गणित काय असावे ?
यात सर्वाधिक महत्वाचे म्हणजे समोरासमोर विक्री, परस्परांमध्ये असलेले किमान ३ मिटर अंतर, २०० लिटर पाण्याचे साठे, वाळूने भरलेल्या आग विझविण्याच्या बादल्या, धुम्रपान निषेधाचे फलक, या नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे चित्र फटाके बाजारात आढळून येते.
शासनाचा लाखो रुपये महसूल बुडाला ..?
शहरातील किती घाऊक व किरकोळ फटाका विक्रेते हे शासनाचे कर भरतात हा संसोधनाचा विषय आहे कारण एका आठवड्यासाठी २ लाख खर्च करून दुकान थाटणारे व्यापारी फटाका विक्रीतून किती कमाई करत असतील याचा अंदाज न केलेला बरा. कारण यंदा प्रशासन निवडणुकांत व्यस्त असल्याचा फायदा उचलत फटाका व्यापाऱ्यांनी आपल्या मनाप्रमाणे शासनाचे नियम धाब्यावर बसवत हजारो ग्राहकांच्या थेट खिशालाच हात घातला असल्याची चर्चा काही व्यापाऱ्यांत होत असून, किती विक्रेते आपल्या विक्रीवर जिएसटी व अन्य कर भरतात हा संसोधनाचा विषय असल्याचे मत एका जुण्या जाणत्या फटाका विक्रेत्याने खासगीत बोलतांना व्यक्त केले आहे.