माहूर| गुरुवार, दिनांक ४ (पौर्णिमा) रोजी माहूर गडावरील श्री दत्तात्रेय संस्थान येथे दत्तजयंतीनिमित्त भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली. हातात निशाण, मुखी “दत्ता दिगंबरा… देवा दत्ता दत्ता”चा जयघोष — या गजरात संपूर्ण माहूर गड दुमदुमून गेला. सभोवतालच्या जिल्ह्यांसह राज्यभरातून भाविकांनी २ डिसेंबरपासूनच मोठ्या संख्येने हजेरी लावत दत्तजन्मोत्सव भक्तिरसात साजरा केला.


काल (दि. ३) दत्तजयंतीनिमित्त गडावरील दत्तशिखर संस्थान येथे भगवान श्री दत्तप्रभूंचा जन्मसोहळा भक्तिभावात संपन्न झाला. गडाचे महंत परमपूज्य श्री श्री मधुसूदन भारती महाराज यांच्या शुभहस्ते दुपारी २ वाजता अभिषेक, समाधीपूजन व जन्मसोहळा विधिवत पार पडला. हजारो दत्तभक्तांनी या पावन सोहळ्यास उपस्थिती लावली.



अभिषेकानंतर सभामंडपात दत्तसोहळा झाला. पोथीवाचनानंतर जन्मसोहळा व दत्तजन्म अध्याय वाचन ऋषिकेश जोशी यांनी केले. मुख्य पुजारी वासुदेव भारती महाराज यांच्यासह चिरंजीव भारती, हरिहर भारती, सुजान भारती, नितेश भारती, माधव गिरी, विलासराव जोशी, रवींद्र जोशी, विकास जोशी तसेच साधुसंत व उत्सव मंडळी उत्साहात सहभागी झाले होते.



गुरुवारी श्री दत्तजयंतीनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी ग्रामसेवक संघटना, पंचायत समिती कर्मचारी, विविध सामाजिक संस्था व नागरिकांच्या वतीने मोफत महाप्रसादाचे अनेक स्टॉल उभारण्यात आले. स्वामी समर्थ अन्नछत्र येथेही हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. माहूरच्या साईनाथ महाराज मठ तसेच श्री आनंद दत्तधाम आश्रमात यंदाही पुरणपोळी व आमरस प्रसादाची परंपरा कायम ठेवत भाविकांसाठी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.



