हिंदु राष्ट्रासाठी शारीरिक, वैचारिक आणि आध्यात्मिक बळ वाढवण्याचा संकल्प ! -NNL
प्रस्तावना : द्वादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ची तपपूर्ती (१२ वर्षे) झाली आहे. या अधिवेशनांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या धर्मनिष्ठ आणि देशभक्त यांच्या संघटनामुळे आज धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र निर्मितीच्या संकल्पशक्तीची स्पंदने वैश्विक स्तरावरही जाणवत आहेत. हिंदु राष्ट्र ईश्वराच्या इच्छेनुसार योग्य वेळी स्थापन होणार आहे.
खरे तर अयोध्येत श्रीरामजन्मभूमीवर श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन सूक्ष्मातून रामराज्याला, म्हणजे हिंदु राष्ट्राला प्रारंभ झालेलाच आहे. त्याला पूर्ण रुपाने साकार करण्यासाठी कृतीची दिशा या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ठरवण्यात आली. सनातन हिंदु धर्म हा भारताचा आत्मा आहे. भारत देश जिवंत रहायचा असेल, तर हा आत्मा सुरक्षित रहाणे आवश्यक आहे; मात्र देशविरोधी शक्तींकडून त्यावरच घाला घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...
