विद्यार्थी, शिक्षक, पालक हा शिक्षणाचा ‘पिरॅमिड’ आहे. शिक्षण घेणे आणि शिक्षण देणे ही बाब सुसंस्कारादृष्टीने विविध पातळ्यावर शिक्षणाचा दर्जा ठरत असे. शाळा- महाविद्यालय हे संस्काराचे विद्यापीठ असायचे, आजघडीला शैक्षणिक संस्थांचा आणि संस्काराचा अर्थाअर्थी काही संबंध राहीला नाही. शिक्षणाचे अर्थकारण प्रचंड प्रमाणात उलाढाल होत आहे. शिक्षण महाग, संस्कार स्वस्त झाले आहेत. संस्काराचा आणि व्यावहारिक बाबींचा सहसंबंध राहिला नाही.
खासगी कोचिंग क्लासेसचा सुुळसुळाट झाला आहे. गल्लोगल्ली कोचिंग क्लासेसवाल्यांनी आपली दुकाने थाटून कोचिंगची उलाढाल करीत आहेत. शैक्षणिक हब आता ‘कॉर्पोरेटर’ झाले आहे. पालकांच्या अतिमहत्त्वाकांक्षा वाढल्यामुळे क्लासेसवाल्यांची चांदी होत आहे. सामान्यातील सामान्य पालक, सामान्यातील अतिसामान्य विद्यार्थी असला तरी तो नामांकित खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेण्याच्या हट्टवादीपणामुळे विद्यार्थ्यांचा प्रचंड लोंढा वाढला आहे. पर्यायाने शैक्षणिक बाजारात गळेकापू जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली. यातूनच बनावट निकाल, गुण वाढवून देण्याचे रॅकेट उघडकीस आले आहेत. प्रत्येक पालकाला आपला मुलगा डॉक्टर आणि इंजिनिअरच व्हावेसे वाटत आहे. इतर अनेक क्षेत्र करिअरचे असून सुद्धा तिकडे डोळेझाक होत आहे.
शाळा- महाविद्यज्ञालये नामधारी तथा टीसी पुरते राहिले आहेत. शिक्षण क्लासेसवाल्यांची मक्तेदारी होत आहे. एक काळ होता खाजगी शिकवणी लावणे म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणाचे लक्षण समजले जायायचे, आज मात्र प्रतिष्ठेचे झाले आहे. नामांकित क्लासेसवाल्यांनी शिक्षणाचे वर्गनिहाय दरपत्रक लावले आहेत. सरासरी लाख- सव्वा लाख अकरावी- बारावीची फिस आहे तर प्राथमिक शिक्षणाचा रेट पन्नास हजारापर्यंत आहे. खाजगी संस्थांवर पहिलीपासून दहावीपर्यंतचा खर्च एकदाच वसूल करीत आहेत.
शेतकरी, रोजंदारी पालक काबाड कष्ट करुन, घाम गाळून जमा झालेले पैसे पाल्याच्या शिक्षणावर लावून ‘जुगार’ खेळत आहेत. काही पालक तर आहे ती प्रॉपर्टीसुद्धा विकून, सोने- चांदीचे दागिणे मोडतोड करुन शिक्षणावर ‘इन्व्हेसमेंट’ करीत असल्याने पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. पहिल्या प्रयत्नात जर निकाल अपेक्षित लागला नाही, तर दोन- तीन वर्षे रिपिट करुन आर्थिक दिवाळखोरीत येत आहेत. एवढे करुनसुद्धा जर विद्यार्थ्याचा- पाल्याचा शेवटी ‘निकालच’ लागला तर मात्र मुलगी असेल तर तिचे दोनाचे चार हात करुन मोकळे होत आहेत तर मुलगा असेल तर गावाकडे त्याला शेतीकामाला जुंपत आहेत. जर कर्मचार्याचा ‘दिवटा’ असेल तर उद्योगधंदा टाकून त्याचा लग्नाचा बार उडवून देत आहेत. जे अति गर्भश्रीमंत आहेत त्यांचे पाल्य ‘नेतेगिरी’ करायला मोकळे होत आहेत.
अशा खाजगी शिकवणीचा विळखा पालकांच्या गळ्याभोवती घट्ट पक्कड लावून नरडीचा घोट घेत आहे. कारण हजारो विद्यार्थ्यांमधून दहा- वीस विद्यार्थी चमकतात. जे पूर्वीपासूनच ज्यांचा शैक्षणिक पाया मजबूत आहे. बाकी ज्यांचा रिझल्ट सर्वसाधारण आला त्या पालकांचे मात्र कंबरडे मोडत आहे. म्हणून पालकांनी आपल्या पाल्यांची शैक्षणिक कुवत पाहून, विद्यार्थ्यांचा कल पाहून त्याला त्याच्या आवडीप्रमाणे शिक्षण दिल्यास इतर अनेक क्षेत्र ओस पडून आहेत. तिकडे आपला मोर्चा वळवला तर पालकांना खाजगी शिकवण्यांच्या विळख्यातून बाहेर पडून मोकळा श्वास घेता येईल अन्यथा अनेक पालक- पाल्यांचे मानसिक स्वास्थ्य धोक्याची पातळी गाठेल. तेंव्हा तेल ही गेले अन् तुपही गेले आणि हाती धोपाटणे आले अशी विदारक अवस्था निर्माण होईल. म्हणून सद्यःपरिस्थितीत आपल्या पाल्याचे करिअर करीत असताना समाजभाग ओळखून आपले वर्तन करावे. इतर करिअर क्षेत्रांचे पर्याय खुले ठेवावेत, जेणेकरुन पाल्य गोंधळून जाणार नाही आणि पालकांनाही सुखाची शांत झोप घेता येईल. पर्यायाने शिकवणी वर्गाची ही दुकाने ओस पडतील एवढे मात्र निश्चित!
लेखक – मारोती भु. कदम, नांदेड, मो. 9049025351