हिमायतनगर, अनिल मादसवार| भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण असलेल्या रक्षाबंधनानिमित्त हिमायतनगर शहरातील राष्ट्रसाधना पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनोखा सामाजिक उपक्रम राबवत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन सण साजरा केला.



यावेळी विद्यार्थ्यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्यात भेट देत पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी अहोरात्र कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या सेवेला सलाम करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांनी हा उपक्रम आयोजित केला.



विद्यार्थ्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या हातावर राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.




पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी राष्ट्रसाधना पब्लिक स्कूलच्या शिक्षकवृंदाचे आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी आणि पोलीस यांच्यातील स्नेहाचे नाते अधिक दृढ होते, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून भविष्यातही असे उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमामुळे पोलीस ठाण्यातील वातावरण काही काळ भावनिक आणि आनंददायी झाले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे शहरातून कौतुक होत आहे.


