किनवट /परमेश्वर पेशवे| नांदेड जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले किनवट तालुक्यातील एकमेव राम वन गमन मार्ग असलेले श्रीक्षेत्र उनकेश्वर येथील शरभंग ऋषी आश्रम देवस्थानाची दयनीय अवस्था झाली असून विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारला झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत राज्यातील ग्रामीण 8 देवस्थानाच्या विकासासाठी 275 कोटी रुपये ला मंजुरी दिली. त्यामध्ये मात्र हेमाडपंती तीर्थक्षेत्र उनकेश्वरच्या विकासासाठी एक छदामही राज्य सरकारने निधी दिला नसल्याने किनवट माहूर मतदारसंघात तीव्र नाराजी पसरली आहे.
नांदेड जिल्ह्या पासून तब्बल 180 किलोमीटर अंतरावर असलेल्या व माहूरच्या पायथ्याशी असलेले गरम पाण्याचे झऱ्याचे तीर्थस्थानकुंड असलेले श्रीक्षेत्र उनकेश्वर शरभंग ऋषी आश्रम हे संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. येथे प्रभू श्रीराम, लक्ष्मण, माता सीता, वनवासात असताना त्यांनी येथील शरभंग ऋषी आश्रम येथे येऊन तपस्वी शरभंग ऋषी यांची भेट घेतली होती. त्यावेळी प्रभू श्रीरामाने येथे अग्निबाण मारून गरम पाण्याचे तीर्थस्थानकुंड तयार केले ते आजही पाणीटंचाईच्या उन्हाळ्याच्या दुष्काळातही अखंडितपणे गरम पाण्याचे तीर्थस्थानकुंड अव्ह्यातपणे चालू राहते. या देवस्थानात हेमाडपंती शिवमंदिर, प्रभू श्रीराम मंदिर, शरभंग ऋषी मंदिर, प्रभू श्री दत्त मंदिर,, शरभंग ऋषी यांचे पवित्र धुनी घर असून येथे भारतातून दररोज हजारो भाविक येतात.
या आख्यायिकेचा प्रसिद्ध ग्रंथ रामायण मध्ये तेराव्या अध्यायात आढळतात. एवढेच काय तर राज्य सरकारने एम ए प्रथम वर्षामध्ये मराठी भाषेची उत्पत्ती या विषयासाठी राज्य सरकारने यादवकालीन पांडू लिपीतील एकूण 13 शिलालेखांचा अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे. त्यापैकी तीन पांडव लिपीतील शिलालेख हे श्री क्षेत्र उनकेश्वर येथील शरभंग ऋषी आश्रमातील आहे. हे विशेष मात्र येथील देवस्थान परिसरामध्ये पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. वर्षभरामध्ये येथे आठ या मोठ्या यात्रा भरतात या यात्रा काळात भाविकांना रस्त्यावर उघड्यावर झोपावे लागतात. तसेच पिण्याची पाण्याची ही व्यवस्था अपुरी असल्याने पाणीटंचाईला सुद्धा सामोरे जावे लागते. आज पर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधींनी श्रीक्षेत्र उनकेश्वरच्या विकासाकडे कायम दुर्लक्ष केले त्यामुळे हे तीर्थक्षेत्र विकासापासून वंचित आहे. या देवस्थान परिसरातील जीर्ण झालेल्या जुन्या इमारतीची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे.
तसेच येथून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या पैनगंगा नदीच्या तीरावर भव्य राष्ट्रीय ब्रह्म गुलाबी कमळ तलाव असून या तलावाचा पर्यटन म्हणून सुशोभीकरण करण्यासाठी नांदेड वनविभागाकडून मांडवी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी ब्रह्मकमळ पर्यटन केंद्र सूक्ष्म विकास आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला आहे. पर्यटन दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे असलेले हे तीर्थक्षेत्र मराठवाडा विदर्भ व तेलंगणाच्या या त्रिवेणी संगमावर असून नुकत्याच गुरुवारला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 ग्रामीण देवस्थानाच्या पर्यटन विकासासाठी व कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे येथील शिवपार्वती तलावाच्या सुशोभीकरणा साठी 14 कोटी 97 लक्ष असे एकूण ग्रामीण तीर्थक्षेत्र विकासासाठी 275 कोटी रुपयांचा विकास निधी राज्य सरकारने गुरुवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत मंजूर केला आहे.
असे असताना रामायण कालीन तीर्थक्षेत्र उनकेश्वर शरभंग ऋषी आश्रम देवस्थान, भारताचे राष्ट्रीय फूल नैसर्गिक ब्रह्म गुलाबी कमळ तलाव पर्यटन केंद्र विकासासाठी एक रुपया सुद्धा राज्य सरकारने दिला नसल्याने किनवट माहूर मतदार संघातील शिवभक्त, राम भक्त, व पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. तेव्हा येथील तीर्थक्षेत्र विकासासाठी भाजपा चे आ. भीमराव केराम यांनी तातडीने मुख्यमंत्री यांच्याकडे येथील विकासासाठी पुरवणी मागणी मंजूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे अशी मागणी जनतेतून होत आहे.