किनवट/नांदेड| नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या सहस्रकुंड धबधबा परिसरात आज एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात पाण्यावर तरंगताना नायलॉन पोत्याच्या फारीमध्ये बांधलेल्या अवस्थेत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला.


प्राथमिक अंदाजानुसार हा मृतदेह अंदाजे दहा ते बारा दिवसांपूर्वीचा असून सडलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती. घटनेची माहिती मिळताच इस्लापूर व ढाणकी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

ही घटना ढाणकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असून मृतदेह पोत्यात बांधलेला आढळल्याने घातपाताचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे सहस्रकुंड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून मृताची ओळख पटवणे, तसेच मृत्यूचे नेमके कारण शोधणे हे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.


