हिमायतनगर, प्रतिनिधी| हिमायतनगर शहरात फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या कृषी औषधांची बनावट (डुप्लिकेट) विक्री होत असल्याची माहिती समोर आली असून, शेतकरी बांधवांनी कृषी औषधे खरेदी करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हिमायतनगर तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी केले आहे.


कृषी औषध खरेदी करताना शेतकऱ्यांनी विक्रेत्याकडून पक्के बिल अवश्य घ्यावे. औषधाच्या पॅकिंगवरील कंपनीचे नाव, बॅच नंबर, उत्पादन तारीख आणि मुदत समाप्तीची तारीख (Expiry Date) तपासावी. तसेच केवळ अधिकृत व विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच कृषी औषधे खरेदी करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.


बाटली, लेबल आणि पॅकिंग हुबेहूब मूळ कंपनीसारखे दिसत असले तरी औषध बनावट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता औषधांची पूर्ण खात्री करूनच खरेदी करावी, असेही वामनराव पाटील वडगावकर यांनी सांगितले.



बनावट औषधांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याबरोबरच आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कृषी विभाग आणि पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, कोणत्याही शेतकऱ्याची बनावट कृषी औषधांद्वारे फसवणूक झाल्यास संबंधित कृषी विभाग आणि पोलीस प्रशासनाकडे तातडीने तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

“खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच बियाणे, खते आणि आता कीटकनाशकांच्या विक्रीतून शेतकऱ्यांची लूट होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात बियाणे उगवले नाही, त्यामुळे त्यांना दुबार पेरणी करावी लागली. खतांसाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागले, तर काही ठिकाणी जादा दर आकारल्याच्या तक्रारी आहेत. तसेच शेतकऱ्यांना करण्यात येणाऱ्या मार्गदर्शन शिबिरात झालेली चालढकल यामुळे अशिक्षित शेतकरी संकटात आला आहे. या सर्व तक्रारी करूनही तालुका कृषी विभागाने ठोस कारवाई केली नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. आता पिके वाचविण्यासाठी शेतकरी धडपडत असताना बनावट कृषी औषधे व कीटकनाशकांची विक्री होऊ नये, यासाठी कृषी विभागाने तातडीने तपासणी मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी. शेतकऱ्यांची पुन्हा फसवणूक होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.” – वामनराव पाटील वडगावकर, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, हिमायतनगर

