नांदेड| नांदेड डाक विभागामार्फत डाक जीवन विमा (PLI) व ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) योजनेंतर्गत “डायरेक्ट एजंट (विमा सल्लागार)” पदासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीसाठीचे अर्ज अधिक्षक डाकघर कार्यालय, नांदेड विभाग येथे उपलब्ध असून, इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून शुक्रवार, दि. 23 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन अधिक्षक डाकघर, नांदेड विभाग यांनी केले आहे.


मुलाखतीसाठी उमेदवारांनी बायोडाटा, सर्व मूळ शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. मुलाखत स्थळ : अधिक्षक डाकघर कार्यालय, नांदेड विभाग, नांदेड – 431601 असे आहे.

पात्रता व मापदंड
- वयोमर्यादा : मुलाखतीच्या दिवशी किमान 18 वर्षे
- शैक्षणिक पात्रता : केंद्र अथवा राज्य शासन मान्यताप्राप्त बोर्डाची 10 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण
अर्ज करण्यास पात्र श्रेणी
बेरोजगार व स्वयंरोजगार करणारे उमेदवार, माजी विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचे माजी विमा एजंट, माजी सैनिक, सेवानिवृत्त शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ते, महिला मंडळ कार्यकर्ते, ग्राम प्रधान, ग्रामपंचायत सदस्य आदी उमेदवार थेट अर्ज करू शकतात.


निवड प्रक्रिया व अटी
उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार असून, यामध्ये व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्त्व, जीवन विमा विषयक ज्ञान, संगणक ज्ञान तसेच स्थानिक भागाची माहिती या बाबींची चाचणी घेतली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना ₹5,000 इतकी सुरक्षा ठेव NSC/KVP स्वरूपात अधीक्षक डाकघर यांच्या नावाने प्लेज करावी लागेल. त्यानंतर एजंट आयडी प्रदान करण्यात येईल.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागामार्फत तात्पुरता परवाना दिला जाईल. IRDA ची परवाना परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तो कायमस्वरूपी परवान्यात रूपांतरित केला जाईल. सदर परीक्षा ३ वर्षांच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. ही नियुक्ती लायसन्स व कमिशन तत्त्वावर राहील, असेही अधिक्षक डाकघर, नांदेड विभाग यांनी स्पष्ट केले आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही स्वयंरोजगाराची सुवर्णसंधी असून, वेळेत अर्ज करून थेट मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

