नांदेड, प्रतिनिधी| सायबर फसवणुकीच्या पैशांचा माग लपविण्यासाठी नागरिकांच्या नावावर बँक खाती उघडून ती सायबर गुन्हेगारांना पुरविणाऱ्या ‘म्युल बँक अकाऊंट’ रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका संशयिताकडून तब्बल ६० बँक खात्यांची पासबुक, एटीएम कार्डे आणि आठ सीमकार्ड जप्त करण्यात आली असून, दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेला रेल्वे स्टेशनसमोरील गवळीपुरा रोड परिसरात काही इसम अशिक्षित व सामान्य नागरिकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या नावाने बँक खाती उघडत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या खात्यांचा वापर ऑनलाइन फसवणुकीसाठी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्याने आपले नाव हर्षदसिंह राजुसिंह अरोरा (रा. बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) असल्याचे सांगितले. त्याच्या अंगझडतीत विविध बँकांची ६० पासबुक, एटीएम कार्डे आणि विविध कंपन्यांची आठ सीमकार्डे आढळून आली.


प्रत्येक खात्यामागे कमिशनचा धंदा
तपासात बालाजी सोपान गुंजाळे (रा. बळीरामपूर, ता. नांदेड ग्रामीण) हा आरोपी क्रमांक एकला खातेधारक उपलब्ध करून देत असल्याचे समोर आले. नागरिकांच्या नावाने बँक खाती उघडणे, त्यांची एटीएम कार्डे मिळवून देणे आणि ही खाती ऑनलाइन फसवणुकीसाठी वापरण्यास देणे, असा प्रकार आरोपींकडून सुरू असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.



सायबर पोलिसांनी NCCRP पोर्टल आणि मनी ट्रेलच्या विश्लेषणातून या खात्यांमधील संशयास्पद व्यवहारांचा तपास केला. या खात्यांचा वापर ऑनलाइन गुंतवणूक, डिजिटल अरेस्ट, शेअर बाजारातील आमिषे आणि इतर प्रकारच्या सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वीकारण्यासाठी झाल्याचे समोर आले आहे.
या खात्यांमधून देशभरातील विविध सायबर फसवणूक प्रकरणांशी संबंधित तब्बल १९.४१ लाख रुपयांच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांचा माग पोलिसांना मिळाला आहे. आरोपी प्रत्येक बँक खात्यामागे कमिशन घेत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
सरकारतर्फे पोलीस हवालदार ब्रम्हानंद लामतुरे यांच्या फिर्यादीवरून नांदेड सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६(सी) व ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वसंत सप्रे करीत आहेत. सायबर फसवणुकीची रक्कम वळविण्यासाठी वापरली जाणारी बँक खाती म्हणजे ‘म्युल अकाऊंट’ होत. अशा खात्यांद्वारे फसवणुकीच्या पैशांचा माग लपविण्याचा प्रयत्न केला जातो. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, सपोनि रवि वाहुळे, पोलीस अंमलदार ब्रम्हानंद लामतुरे, ढवळे, पिंगलवाड तसेच सायबर पोलिसांनी केली.
खाते, एटीएम किंवा सीमकार्ड भाड्याने देऊ नका!
नागरिकांनी पैशांच्या आमिषाने आपले बँक खाते, एटीएम कार्ड, चेकबुक, मोबाईल सीमकार्ड किंवा इंटरनेट बँकिंग सुविधा कोणालाही वापरण्यास देऊ नये. अशा प्रकारे खाते उपलब्ध करून देणे हा स्वतः गुन्हा असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड पोलिसांनी केले आहे.

