नांदेड,प्रतिनिधी | नांदेड येथे दर्शनासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्यानंतर वजीराबाद पोलिसांनी अवघ्या दहा दिवसांत तिचा पंजाबमध्ये शोध घेत तिला सुखरूप ताब्यात घेतले. ‘ऑपरेशन मुस्कान’अंतर्गत वजीराबाद पोलिसांनी केलेल्या या उल्लेखनीय कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.


पंजाब राज्यातील फिरोजपूर येथील एक अल्पवयीन मुलगी आपल्या पालकांसह ४ जुलै रोजी नांदेड येथे दर्शनासाठी आली होती. यावेळी अज्ञात इसमाने तिचे अपहरण केल्याची तक्रार तिच्या पालकांनी दिली होती. त्यावरून वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वजीराबाद पोलिसांनी तपासाला वेग दिला. तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक खंडू दर्शने यांनी तांत्रिक माहिती, गोपनीय माहिती तसेच विविध माध्यमांचा वापर करून मुलीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान मुलगी पंजाबमधील दोदरा, ता. समाना, जि. पटियाला येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी १६ जुलै रोजी तेथे पोहोचून अल्पवयीन मुलीचा सुखरूप शोध घेतला.



संशयित आरोपीविरुद्ध कठोर कारवाई
मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर तिच्या जबाबाच्या आधारे जसपालसिंह आवतारसिंह (वय २३, रा. दोदरा, ता. समाना, जि. पटियाला, पंजाब) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह पोक्सो कायद्यान्वये पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. मुलीला आवश्यक संरक्षण देऊन बाल सुधारगृहात सुरक्षित ठेवण्यात आले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित कुंभार, पोउपनि खंडू दर्शने, महिला पोलीस हवालदार बनसोडे, पोलीस अंमलदार मदिकुंटावार, जैस्वाल तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोउपनि मारोती चव्हाण, पोह राजेंद्र सिटीकर व दीपक ओढणे यांनी केली. नांदेड जिल्हा पोलिसांकडून ‘ऑपरेशन मुस्कान’अंतर्गत हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी बालक हरवल्यास विलंब न करता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

