हिमायतनगर,अनिल मादसवार| वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाचा होऊ लागलेला ऱ्हास तसेच पाण्याहची कमतरता लक्षात घेऊन लकडोबा चौकात असलेल्या वैकुंठधाम हिंदू स्मशान भूमी समितीने पावसाळा सुरु झाल्यापासून वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात नगरपंचायतीचे कर्मचारी मारोतराव हेंद्रे यांनी सहभाग घेऊन वडिलांच्या स्मृती प्रीत्यर्थ सुपारीची २१ झाड दान देऊन त्याची लागवड केली आहे. हिंदू स्मशान भूमीच्या सामाजिक कार्यात शहरातील इतर नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केलं.
हिमायतनगर शहरातील लाकडोबा चौक परिसरात असलेल्या हिंदू स्मशान भूमीचे आता स्वर्गात रूपांतर होऊ लागले आहे. येथील स्मशानभूमीच्या कायापालट करण्यासाठी मागील वर्षभरापासून दर रविवारी येथील वैकुंठधाम हिंदू स्मशान भूमी समितीच्या युवकांनी श्रमदान करण्याला सुरुवात केली आहे. युवकांच्या श्रमसदनात शहरातील विविध जागरूक नागरीकातून सहकार्य मिळत असल्याने स्मशान भूमीचे रुपडे पालटले आहे. स्मशान भूमीच्या स्वच्छतेबरोबर येथे सिमेंट काँक्रेटचा रस्ता आणि विजेची सोय झाल्यानंतर आता स्मशान भूमीच्या सुशोभीकरणाला सुरुवात झाली आहे. यासाठी युवकांनी पुढाकार घेऊन स्मशानभूमीत येणाऱ्यांना उन्हाळ्यात सावली मिळावी. या उद्देशाने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम जोमात सुरू केला आहे.
सुरुवातीला जनतेला आवाहन केल्यानंतर आत्तापर्यंत अनेकांनी विविध प्रकारचे औचित्य साधून शेकडो वृक्ष, वृक्षाला सुरक्षा गार्ड यासह इतर साहित्याची भेट देऊन या सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला आहे. त्यामुळे स्मशानभूमी परिसर हा वृक्ष राजांनी फुलणार आहे. तसेच या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या वृक्षाचे संगोपन करण्याचा संकल्प स्मशानभूमी विकास समितीने केला असून, ज्यांना कुणाला स्मशानभूमीसाठी काही करावयाची इच्छा असल्यास किंवा देणगी स्वरूपात सहभाग घ्यायची अपेक्षा असल्यास त्यांनी समितीकडे संपर्क साधून दान द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हिमायतनगर नगरपंचायतीमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी मारोतराव हेंद्रे यांनी आपल्या वडिलांच्या स्मृती प्रीत्यर्थ येथील लकडोबा स्मशान भूमीला २१ झाडं दान दिली असून, आज त्या झाडांची लागवड समितीच्या सदस्यांच्या उपटशेतीत करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या या सामाजिक उपक्रमाबद्दल समितीने स्वागत केले असून, इतरांनी स्मशान भूमीच्या सुशोभीकरणाच्या उपक्रमात सहभागी व्हावा असं हेंद्रे यांनी म्हंटल आहे. यावेळी वामनराव पाटील वाडगावकर, ज्ञानेश्वर शिंदे, श्रीकांत घुंगरे, उदय देशपांडे, संतोष बनसोडे, सुभाष बालपेलवाड, विलास वानखेडे, राम जाधव, आदींसह वैकुंठधाम हिंदू स्मशान भूमी समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.