नांदेड| माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेत पंतप्रधान पीक विमा योजनेसह शेतकऱ्यांशी निगडीत अनेक प्रश्नांवर विस्तृत चर्चा केली व आवश्यक ते निर्देश दिले.
खा. अशोकराव चव्हाण यांनी यापूर्वी २२ ऑगस्ट रोजी देखील जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी झालेल्या निर्णयानुसार, २०२३-२४ च्या खरिप हंगामात पीक विमा न मिळाल्याबाबत किंवा कमी भरपाई मिळाल्याबाबत तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यासाठी विमाधारक शेतकऱ्यांना ३ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ती मुदत आणखी तीन दिवसांनी वाढवण्यात आली.
या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील १ लाख ५८ हजार शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रारी नोंदवल्या असून, येत्या २५ सप्टेंबरपर्यंत त्यांची छाननी पूर्ण होणार असल्याचे प्रशासनाने यावेळी सांगितले. मात्र, या कामाला अधिक गती देऊन छाननीचे काम २० सप्टेंबरपूर्वीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना खा. चव्हाण यांनी केली. दरम्यानच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन पात्र शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा पूर्ण करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.
यंदा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानासंदर्भात नांदेड जिल्ह्यातील सुमारे ७.५० लाख शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्याचे प्रशासनाने या बैठकीत सांगितले. जिल्ह्यातील बहुतांश मंडळात अतिवृष्टी झाल्याने पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना यंदाची २५ टक्के अग्रीम भरपाई देण्याबाबतची कार्यवाही वेगाने व कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावी, अशी सूचना खा. अशोकराव चव्हाण यांनी बैठकीत केली.
विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान बँकांकडून कर्ज खात्यात परस्पर वळते केले जात असून, हा प्रकार राज्य शासनाच्या आदेशांविरुद्ध असल्याचा मुद्दा त्यांनी या बैठकीत मांडला. त्यावर बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय आर्थिक मदत व अनुदान बँकांनी परस्पर कर्ज खात्यात वळते करणे अपेक्षित नसल्याचे स्पष्ट केले. याबाबत बँक अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याची खा. अशोकराव चव्हाण यांची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली. याशिवाय शेतकऱ्यांच्या इतरही अनेक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. या बैठकीला जिल्ह्यातील अनेक विभागांच्या अधिकाऱ्यांसह बाळासाहेब देशमुख बारडकर, भाजप तालुकाध्यक्ष डॉ. लक्ष्मण इंगोले, प्रकाश देशमुख भोसीकर, जगदीश पाटील भोसीकर, किशोर स्वामी यांच्यासह शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ देखील उपस्थित होते.