नांदेड| राज्य शासनाने नांदेड शहरातील अनेक एकर जमिनीवरील आरक्षण उठवले असताना देखील महानगरपालिका मात्र जमीन व प्लॉट धारकांना अद्याप जमिनीची गुंठेवारी व एन.ए. लेआउुट प्रक्रिया करून देत नाही. तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून नियमित सुरू असणारी गुंठेवारी देखील बंद आहे. या तिन्ही बाबी तात्काळ सुरू करण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोहसीन खान पठाण यांच्या नेत्वााखालील शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांना दिले आहे.
आरक्षण उठलेल्या जमीन व प्लॉट मालकां मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पण येथील महानगर पालिका प्रशासन मात्र आरक्षण उठलेल्या जमिनीची गुंठेवारी व एन.ए. लेआउुट प्रक्रिया करत नाही. यामुळे अनेकांना आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. बऱ्याच जणांनी आपले प्लॉट विक्रीस काडले आहेत, पण ते घेण्यासाठी कोणीही धजावत नाही. त्यामुळे त्यांचे नियोजन कोलमडत असून याचा फटका कुटुंबातील व्यक्तींना देखील बसत आहे.
नागरिकांसोबतच अनेक जण फ्लोटिंगचा व्यवसाय करतात ते देखील अडचणीत सापडले आहेत. त्याबरोबरच हजारो ब्रोकरवर ही सध्या उपासमारीची वेळ आली आहे. घरातील कारभार चालवणे देखील त्यांना अवघड झाले आहे. काही जणांची मुले उच्च शिक्षण घेत होती. त्यांना आपले अर्धवट शिक्षण देखील सोडावे लागले आहे. तसेच काही जणांना आपल्या मुलीचा विवाह करायचा होता, तो देखील त्यांना थांबवावा लागला आहे. यामुळे असे भूखंड मालक आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत.
महानगरपालिकेने तात्काळ आरक्षण उठलेल्या जमिनीची गुंठेवारी व एन.ए. लेआउुट प्रक्रिया सुरू करावी तसेच नियमित गुंठेवारी देखील सुरू करावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष मोहसीन खान पठाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठमंडळाने मंगळवार रोजी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांना दिले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष माधव पाटील चिंचाळे, उपाध्यक्ष अफसर पठाण, आयुब खान, अब्दुल आतिक, असलम पटेल, शेख इमरान, ऐजाज मिर्झा बेग, सय्यद मुन्वर, शेख आवेश, मोहम्मद दानिश, तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सय्यद अहेमद यांच्यासह आदीजन उपस्थित होते.
आम्ही राज्य शासनाकडे महानगरपालिकेच्या वतीने याबाबत प्रस्ताव पाठवला असून पत्र व्यवहार देखील सुरू आहे. लवकरात लवकर आरक्षण उठलेल्या जमिनीचे व प्लॉटची गुंठेवारी व एन.ए. लेआउुट सुरू होईल असे आश्वासन यावेळी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी शिष्टमंडळाला दिले.