श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। शहरात युवकांमध्ये बुलेट गाडीची क्रेझ पाहायला मिळत आहे. गाडी घेतल्यावर मोठ्या आवाजाचे सायलेंसर टाकून बुलेटचा ध्वनी वाढवला जातो. काही गाड्यांमध्ये तर बंदुकीतून गोळी बाहेर येण्यासारखा आवाज काढण्यात येतो.
फटाक्यांची लड फुटावी, किंवा एखादा बॉम्ब फुटावा असे आवाज बुलेट गाड्याचे येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना, रुग्णांना, वृध्दांना,व दर्शनाला येणा-या भाविकांना त्रास होत आहे. पोलिसांनी कधीही कारवाहीच केली नसल्याने त्याचा धाक बुलेट धारकांना बसताना दिसून येत नाही.
रस्त्यावर वाहन चालवताना बुलेट स्वारांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मोठ्या आवाजातील सायलेंसर नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. शाळा, महाविद्यालय परिसरात तर मोठ्या आवाजाची बुलेट चालवणे तरुणाईंसाठी स्टेटस बनले आहे.
शासनाने दिलेले निर्देश आणि कंपनीने दिलेल्या निकषांना डावलून खाजगी मेकॅनिकलकडून मोठा आवाज करणारे सायलेंसर लावण्याचे प्रकार माहूर परीसरात सर्रासपणे वाढले आहेत. शौकीन भरधाव मोठ्या आवाजाच्या दुकाचाकीवर फिरतात. यावेळी या कर्णकर्कश आवाजाचा अनेकांना नाहक त्रास होतो. सकाळी व संध्याकाळी तर अशा वाहनांची जणू स्पर्धाच दिसून येते. दुचाकी स्वाराचे पालक याकडे पुत्रप्रेमापोटी दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
शासनाने केलेल्या सूचनेनुसार वाहन तयार केले जातात. त्यात कुठलाही बदल करू नये, अशी ताकीद दुचाकी, चारचाकी कंपन्यांकडून दिली जाते. असे असले तरी, बाहेर व्यावसायिक सर्रास गाड्यांना नियमबाह्य साहित्य लावून देतात. त्यात सायलेन्सरचा मोठा वाटा आहे. दुचाकी, चारचाकीतून किती ध्वनी प्रदूषण बाहेर पडावे याचे निकष देण्यात आलेले आहेत.
तरी हौस म्हणून सायलेन्सरमध्ये अनधिकृत बदल केला जातो. त्यात वाहन चालकांवर कारवाई होते. मात्र, ज्या व्यवसायिकांनी ते साहित्य विकले, बसवून दिले त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. अशा व्यावसायीकांवर कारवाई केल्यास त्याचा निश्चित परिणाम होइल. त्यामुळे पोलिसांनी अशा व्यावसायीक, दुचाकी चालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.