कंधार, सचिन मोरे |कंधार तालुक्यातील संगमवाडी गावचे सुपुत्र आणि प्रख्यात युरोलॉजिस्ट डॉ. व्यंकट गीते यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ च्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे कंधार तालुक्यासह नांदेड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून राज्यभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


यापूर्वी मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 व नियमावली 2014 अंतर्गत राज्य सल्लागार समितीच्या सदस्यपदी त्यांची निवड झाली होती. आता कुलगुरूपदी झालेली नियुक्ती ही त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाची, प्रशासन कौशल्याची आणि वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल मानली जात आहे. डॉ. गीते हे सध्या छत्रपती संभाजीनगर येथील अतिविशेषोपचार केंद्रातील (SSB) युरोलॉजी विभागाचे प्रमुख असून, नाशिक येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावली आहे.


सन 1974 मध्ये मन्याड नदीकाठी वसलेल्या संगमवाडी येथे त्यांचा जन्म झाला. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले. किडनी प्रत्यारोपण, वैद्यकीय संशोधन आणि सामाजिक बांधिलकी या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. राज्यभर आयोजित 350 हून अधिक आरोग्य शिबिरांमधून हजारो रुग्णांना त्यांनी सेवा दिली आहे.



डॉ. गीते यांनी एमबीबीएस, एम.एस., एम.एन.ए.एम.एस. आणि डीएनबी (युरोलॉजी) या पदव्या संपादन केल्या असून, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात युरोलॉजी विषयातील पीएचडीसाठी उपलब्ध असलेले ते एकमेव मार्गदर्शक आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा दोन वेळा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे. ते Indian Journal of Urology चे बोर्ड सदस्य असून, पश्चिम विभागीय युरोलॉजी असोसिएशनचे माजी सदस्य आहेत. तसेच जे. जे. रुग्णालय येथे मेंदूमृत रुग्णाच्या किडनी प्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्याचा मानही त्यांना मिळाला आहे.
अधिष्ठाता, विभागप्रमुख, संचालक आणि प्राध्यापक अशा विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळणाऱ्या डॉ. गीते यांचे 53 संशोधन लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले असून, युरोलॉजी विषयावरील विविध पुस्तकांमध्ये त्यांच्या सहा प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. डॉ. व्यंकट गीते यांच्या कुलगुरूपदी झालेल्या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आरोग्य सेवेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात असून कंधार तालुक्यासह राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

