नांदेड, प्रतिनिधी | अति प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्पांतर्गत लोहा तालुक्यातील नगारवाडी येथील प्रगतिशील शेतकरी विश्वनाथ जायभाये यांच्या एकात्मिक सेंद्रिय शेती प्रकल्पाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भेट देत विविध नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती उपक्रमांची पाहणी केली. यावेळी ‘एक लक्ष बांबू लागवड’ अभियानांतर्गत शेतालगतच्या नाल्याच्या काठावर बांबूची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.


यावेळी उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी उत्तम गायकवाड, तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे, उपकृषी अधिकारी अनिल वडजे, हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रकल्पाचे प्रादेशिक समन्वयक दिनेश खडसे, पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक प्रविण काटेवाढ, सरपंच सुधाकर जायभाये, उपसरपंच देवराव चव्हाण तसेच कृषी, महसूल, ग्रामपंचायत, वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR) आणि अश्वमेध संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.


जिल्हाधिकाऱ्यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत विकसित आंबा बाग, मनरेगाअंतर्गत उभारलेली सिंचन विहीर तसेच गांडूळखत (वर्मी कम्पोस्ट) युनिट यांची पाहणी केली. विश्वनाथ जायभाये यांच्या शेतात शेवगा, आंबा, जांभूळ, पेरू, चिंच, बोर, चिकू, आवळा, लिंबू, पपई, नारळ या फळपिकांसह काकडी, वांगे, टोमॅटो, मिरची आदी भाजीपाला पिकांची सेंद्रिय पद्धतीने लागवड करण्यात आली आहे. तसेच झेंडू फुलशेती आणि आधुनिक, शाश्वत शेती तंत्रज्ञानाची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली.




यावेळी विश्वनाथ जायभाये, त्यांची पत्नी जोती जायभाये आणि मुलगा रामन जायभाये यांनी शेणखत, गांडूळखत, जीवामृत, घनजीवामृत, बीजामृत, दशपर्णी अर्क, अग्निअस्त्र आणि ब्रह्मास्त्र यांसारख्या जैविक निविष्ठांचा वापर, पीक फेरपालट, आंतरपीक पद्धती, सेंद्रिय आच्छादन (मल्चिंग), जैविक कीड-रोग व्यवस्थापन आणि पाण्याचा कार्यक्षम वापर याबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले, “सेंद्रिय शेतीमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणि सूक्ष्मजीवांची संख्या वाढून मातीची सुपीकता टिकून राहते. उत्पादन खर्चात बचत होत पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते. तसेच रासायनिक अवशेषमुक्त अन्न उत्पादनामुळे ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षणही होते.” या भेटीदरम्यान नगारवाडी परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी आणि विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रगतिशील शेतकरी विश्वनाथ जायभाये यांच्या सेंद्रिय शेतीच्या प्रयोगांचे कौतुक करत, इतर शेतकऱ्यांनीही अशा शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन केले.

