नांदेड | सणांचा राजा म्हणजे दीपावली अर्थात धनत्रयोदशीपासून भाऊबिजेपर्यंत चालणारा दीपोत्सव म्हणजे आनंदाची, थाटामाटाची जणू पर्वणीच होय, अशी दिवाळी एकीकडे प्रचंड झगमगाट तर दुसरीकडे अनेकांच्या आयुष्यात अंधःकारमय परिस्थिती असते म्हणून त्यांच्याही जीवनात आनंदाचा उजेड पडावा म्हणून नांदेड शहरातील बालमित्रमंडळाच्या वतीने धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला शहरातील अंध, मनोरुग्ण, भटके, निराधार दिव्यांग अशा वंचित घटकातील गरजू आणि खंगलेल्या बेवारस लोकांच्या आणि उपेक्षित शाळाबाह्य मुलांच्या चेहर्यावर काही क्षणापुरते हास्य फुलवण्याचा प्रामाणिक प्रयत्न.
अशा गरजूंचा शोध घेऊन रेल्वे स्टेशन, बसस्थानक, गोकुळनगर, मश्जिद, मंदिरासमोरील भिकारी अशा गरजूंचा शोध घेऊन त्यांना दिवाळी फराळाची किट त्यात मोतीचूर लाडू, चकली, फरसन, म्हैसूरपाक, चिवडा आदी पदार्थ असलेली किट उपेक्षित, वंचित, भटके, दिव्यांग, मनोरुग्ण यांचा शोध घेऊन फराळ वाटपाचे समाजोपयोगी काम केले.
सदर उपक्रम राबविण्याकरीता सामाजिक कार्यकर्ते तथा बालमित्रमंडळाचे संस्थापक उमाकांत शिवशेट्टे, सप्तरंगी साहित्य मंडळ महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष मारोती कदम, बालमित्र मंडळाचे पदाधिकारी ज्ञानेश्वर गायकवाड, धर्मपूरी येन्नावार, सायलू तोंदूलवार, शिक्षिका स्मिता ठक्कुरवार, साईनाथ कोनेरवार, सचिन तुंगेनवार, शोभा कासेवाड, विजय दिंडे, जगन्नाथ दिंडे आदींनी परिश्रम घेतले. सदर उपक्रमाचे समाजस्तरावर कौतुक होत आहे.