हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर नगर पंचायत निवडणुकीत आता केवळ एकच दिवस बाकी असताना शहरातील अनेक वॉर्डांमध्ये शासकीय पोल चिठ्ठ्या मतदारांपर्यंत पोहोचल्या नसल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणूक प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असतानाच मतदारांना आपले मतदान कोणत्या बूथवर आणि कोणत्या वॉर्डात आहे याची अचूक माहिती न मिळाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम व नाराजी व्यक्त होत आहे.


शहरातील विविध भागांमध्ये अद्यापही पोल चिठ्ठ्यांचे वितरण झाले नसल्याचे समोर आले असून, या दुर्लक्षामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्या ठिकाणी चिठ्ठ्या पोहोचल्या नाहीत, तेथील मतदारांना उद्याच्या मतदानाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.


एकीकडे शासन अधिकाधिक नागरिकांनी मतदानात सहभागी व्हावे यासाठी जनजागृती करत असताना, हिमायतनगर शहरात मात्र शासकीय पोल चिठ्ठ्या न मिळाल्याने शासकीय यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. निवडणूक प्रक्रियेतील हा अकार्यक्षमपणा नागरिकांच्या नाराजीस कारणीभूत ठरत आहे.


या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी निवडणूक विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. मतदारांना त्यांच्या बूथची माहिती आणि पोल चिठ्ठ्या त्वरित उपलब्ध करून देत प्रत्येक मतदाराचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



