नांदेड, प्रतिनिधी| नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीपासून नांदेडपर्यंत राजकीय वातावरण तापले आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने नांदेडमध्ये केंद्र सरकारविरोधात जोरदार आंदोलन छेडले. काँग्रेसच्या या आक्रमक भूमिकेला भाजपनेही थेट प्रत्युत्तर देत जिल्हा काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढला. त्यामुळे नांदेडमध्ये बुधवारी भाजप-काँग्रेसमधील राजकीय संघर्ष अक्षरशः रस्त्यावर आला.
महात्मा फुले पुतळा परिसरात काँग्रेसच्या आंदोलनाचे नेतृत्व उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, महेश देशमुख तरोडेकर आणि शहर जिल्हाध्यक्ष अब्दुल गफार यांनी केले. शंकर शिंदे, मुन्ना अब्बास यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण आणि राहुल गांधी यांच्या प्रतिमा हातात घेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारच्या भूमिकेचा निषेध केला.



‘विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू आहे’ असा आरोप करत काँग्रेसने केंद्र सरकारला लक्ष्य केले. आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.


काँग्रेसच्या आंदोलनावर भाजपचा हल्लाबोल
काँग्रेसचे आंदोलन संपत नाही तोच भाजपने मैदानात उतरून काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. आमदार अमरनाथ राजूरकर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे, किशोर स्वामी, उपमहापौर दीपकसिंह रावत, विजय येवनकर, मनोज भंडारी, प्रवीण साले आणि राजू यन्नम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले. काँग्रेसच्या आंदोलनाचा निषेध करत भाजपने काँग्रेसवर राजकीय नौटंकीचा आरोप केला. आंदोलनातील उपस्थितीवरूनही भाजपकडून काँग्रेसला लक्ष्य करण्यात आले.




‘नीट’च्या मुद्द्यावरून राजकीय स्कोअर सेटल करण्याचा प्रयत्न?
नीट पेपरफुटीचा मुद्दा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असला, तरी नांदेडमध्ये या प्रश्नाने भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय संघर्षाला नवे वळण दिले आहे. काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली, तर भाजपने काँग्रेसच्या आंदोलनावरच पलटवार करत राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला.

दोन्ही पक्षांच्या आंदोलनांमध्ये घोषणाबाजी, आरोप-प्रत्यारोप आणि एकमेकांवर टीकेची झोड उठल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर नीट पेपरफुटीचा मुद्दा नांदेडच्या राजकारणात ‘विद्यार्थ्यांचा प्रश्न’ राहिला की ‘राजकीय हत्यार’ बनला, याची चर्चा आता रंगू लागली आहे. पोलिसांनी दोन्ही आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली.

