HomeनांदेडAccident News : हिमायतनगर–भोकर महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच

Accident News : हिमायतनगर–भोकर महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच

टाकराळा फाट्याजवळ बोलेरो जीपची दुचाकीला समोरून धडक; दोन ठार, एक गंभीर

हिमायतनगर| हिमायतनगर–भोकर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर अपघातांची मालिका सुरूच असून, टाकराळा बु. फाट्याजवळ बोलेरो जीप आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवार, दि. २१ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास रिमझिम पावसात घडला आहे. या घटनेवरून पुन्हा हिमायतनगर–भोकर महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असल्याची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे.

हिमायतनगर तालुक्यातील मौजे सोनारी येथील बांधकाम मजूर व मिस्त्री दिवसभर राजवाडी परिसरात बांधकामाचे काम करून दुचाकी (क्र. एमएच २६ झेड ६४९४) वरून सोनारीकडे परतत होते. त्याचवेळी बोलेरो जीप (क्र. एमएच १२ एसक्यू ८३७२) हिमायतनगरकडून भोकरच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. टाकराळा फाट्याजवळील वळणावर बोलेरो जीपने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात ताहेर बेग महेबूब बेग (वय ३५) आणि शेख युनूस शेख खाजा (वय ३४, रा. सोनारी, ता. हिमायतनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर चंद्रकांत भिमराव शहाणे (वय २४, रा. सोनारी) हा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर भोकर येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मृत दोन्ही युवकांवर सोनारी येथील मुस्लिम स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आला. दोघेही आपल्या कुटुंबातील कर्ते पुरुष असल्याने त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे.

दिशादर्शक फलक लावण्याची मागणी
हिमायतनगर–भोकर महामार्गावर अनेक महत्त्वाच्या ठिकाणी दिशादर्शक तसेच ‘वाहने सावकाश चालवा’ यासारखे सुरक्षाविषयक फलक नाहीत. तसेच स्पीड ब्रेकर देखील नाहीत. तसेच अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावर मोठया भेगा पडल्या आहेत. तरीही सोनारीजवळ टोलवसुली सुरू आहे. याच टाकराळा फाट्याजवळील वळणावर यापूर्वीही मोठे अपघात होऊन अनेकांचे जीव गेले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

तसेच महामार्ग तयार झाल्यापासून अनेक नागरिकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, त्या ठिकाणी तातडीने दिशादर्शक व सुरक्षाविषयक फलक आणि स्पीड ब्रेकर लावावेत, तसेच रस्त्याची दुरुस्ती करावी. अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून करण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी मृतांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments