हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) अश्विन शुद्ध प्रतिपदा शके १९४७, दिनांक २२ सप्टेंबर रोजी सोमवारी वाढोणा येथील माता कालिंका मंदिरात ‘उदो… उदो…’ च्या जयघोषात व भंडारा उधळणीच्या उत्साहात गोंधळाच्या गजरात घटस्थापना करण्यात आली. यावेळी पुरोहितांच्या मंत्रोच्चाराने व अभिषेक-महापूजेने मंदिर परिसर दुमदुमून गेला.


हिमायतनगर शहराची कुलस्वामिनी माता कालिंका देवीचे महत्त्व सर्वदूर पसरलेले आहे. नवसाला पावणारी म्हणून ख्याती असलेल्या या मंदिरातील मूर्ती वाकाटक-चालुक्यकालीन आहे. दैत्यांचा संहार करून धर्माचे रक्षण करणाऱ्या महिषासुरमर्दिनीच्या रूपातील ही प्रतिमा शेकडो वर्षांपासून भक्तांच्या श्रद्धास्थानी विराजमान आहे.



हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोमवारी पार पडलेल्या घटस्थापणा विधीप्रसंगी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी पूजेचा मान स्वीकारला आणि देवीचे दर्शन घेत उपस्थितांना नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. पुरोहित कांतागुरु वाळके, साईनाथ बडवे यांच्या वाणीत मंत्रोच्चारातून धार्मिक विधी आणि अलंकार सोहळा थाटात संपन्न झाला. यावेळी श्री परमेश्वर मंदिराचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्धन ताडेवाड, मंदिर कमेटीचे अध्यक्ष राजेंद्र रामदिनवार, सचिव संजय मारावार आदींसह मंदिर कमिटीचे संचालक व समस्त गावकरी महिला पुरुष भाविक मंडळी उपस्थित होती.


नवरात्रोत्सव निमित्ताने मंगळवार, दि. २३ सप्टेंबरपासून संगीतमय देवी भागवत प्रवचनमालेस प्रारंभ होणार असून, सात दिवस ह.भ.प. सत्यदेवजी महाराज भांबुलकर व्यासपीठ सांभाळणार आहेत. दुपारी १ ते ४ या वेळेत दररोज कथा होणार आहे. तसेच मंदिराच्या वतीने विविध धार्मिक, सांस्कृतिक व स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन मंदिर कमिटीने केले आहे.


