हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव शहरात कर्जाच्या ताणामुळे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. ही दुर्दैवी घटना २२ जानेवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशनलगत असलेल्या एका कॉम्प्लेक्समध्ये उघडकीस आली.


आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव उमेश जिरवणकर (वय ३३ वर्षे) असे असून, तो हदगाव शहरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, कर्जबाजारीपणाचा मानसिक ताण सहन न झाल्याने त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच हदगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आत्महत्ये मागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, तरुण वयात जीवन संपवल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबीयांवर अचानक कोसळलेल्या या दुःखामुळे सर्वत्र शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, वाढते कर्ज, आर्थिक अडचणी आणि मानसिक तणाव यामुळे तरुण पिढी टोकाची पावले उचलत असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने, मानसिक आरोग्य व आर्थिक समुपदेशनाची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

