हिमायतनगर हा पूर्वीचा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला! लढावू नेत्यांचा बालेकिल्ला म्हटले तरी अधिक समर्पक होईल!. या गावाच्या पंचक्रोशीतील गावांच्या विकासासाठी सिंहाची छाती असलेले नेते म्हणजे भाई विठ्ठलरावजी शिंदे, भाई लक्ष्मणरावजी शक्करगे, नरहरी लुटे, भास्करराव दुसे, शेख अब्दुल्ला रामचंद्रराव मुधोळकर, भाई डी. के. माळवतकर आणि त्यांचे कितीतरी सहकारी. यातील काही नेते कॉंग्रेस किंवा इतर पक्षातील होते पण गावांचा विकास हेच त्यांचे ध्येय होते. याच लढ्यातील जिगरबाज, लढावू, आणि गरिबांचे नेते भाई लक्ष्मणरावजी शक्करगे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जाण्याने हिमायतनगरच्या विकासाच्या लढ्यातील एक समर्पित नेतृत्व कायमचे हरपले आहे. त्याचबरोबर हिमायतनगरच्या विकासलढ्याच्या प्रारंभीच्या लढ्यातील शेवटचा योद्धा या जगातून निघून गेल्याने ते पर्व आता संपले आहे.
हिमायतनगर हे शहर आज तालुका असले तरी ते पूर्वी हदगाव तालुक्यात होते. हिमायतनगर हे गाव आज चाळीस वर्षांपूर्वी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता. तिकडे कंधार शहर भाई केशवरावजी धोंडगे, भाई गुरुनाथरावजी कुरुडे यांच्या नेतृत्वाखाली भारलेले शेकापचा बालेकिल्ला होता तर इकडे हिमायतनगरला भाई विठ्ठलराव शिंदे यांचे तुफानी वक्तृत्व, धाडसी आणि बेडरवृत्ती आणि त्यांना मिळालेली लक्ष्मणराव शक्करगे यांची तेवढीच मोलाची साथ, दोघांचेही झंझावाती दौरे यामुळे हिमायतनगर शेकापचा बालेकिल्ला होता.
लक्ष्मणरावजी शक्करगे एका गरीब घरातील. नेतृत्वाचा कुठलाही वारसा नसलेला. परंतु गोरगरिबांमध्ये मिसळणे, घरोघरी जाणे, त्यांच्या समस्या सोडवणे, त्यांच्या व गावाच्या विकासासाठी आंदोलने करणे यामुळे ते जनसामान्यांचे आवडते नेते झाले. अनेक वर्षे हिमायतनगरचे सरपंच पद गावच्या समस्या सोडवण्यासाठी सत्कारणी लावले. त्याकाळी नांदेड जिल्ह्यात किंवा देशात हिंदू-मुस्लिमांमध्ये कोणत्यातरी कारणांवरून दंगली व्हायच्या. त्याचे लोन गावोगावी पसरायचे.
हिमायतनगरलाही हिंदू आणि मुस्लीमांची लोकसंख्या जवळपास बरोबरीची. परंतु लक्ष्मणराव शक्करगे हे भाईचारा ठेवण्यात नेहमीच यशस्वी व्हायचे… कारण मुस्लीम बांधवांमध्येही ते एक समजदार आणि इमानदार तसेच गरिबांविषयी आत्मीयता असलेला नेता म्हणूनच त्यांची ओळख होती. मुस्लीम बांधवांच्या बैठकीत ते असायचे. त्यांच्या दुकानात, रस्त्यावर कुठेही बसून ते त्यांचे म्हणणे, समस्या ऐकायचे व सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे.
गरिबांविषयी असलेला कनवाळूपणा तसेच गावविकासासाठीचा लढावूपणा यामुळे त्यांना अफाट लोकप्रेम मिळत गेले. आणि याच प्रेमाच्या बळावर त्यांनी कॉंग्रेसचे नांदेड जिल्ह्यातील त्यावेळचे महत्त्वाचे नेते विनायकरावजी सरसमकर यांचा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पराभव केला. आणि जि. प. सदस्य म्हणून लक्ष्मणरावजी शक्करगे हे निवडून आले! पंचक्रोशीत या विजयाने अपूर्व असा जल्लोश झाला होता. गरीब घरातला नेता म्हणून जिल्हा परिषद सदस्य झाला होता.
सरकार कोणतेही येवो पण त्यांनी हिमायतनगरच्या विकासाकडे दुर्लक्षच केले. काही आमदारांनी निवडून आल्यानंतर हिमायतनगरला बसस्थानक उभारू असे आश्वासन दिले. ही आश्वासने देऊन पन्नास वर्षे झाली. गाव तालुकाही झाले परंतु अजूनही येथे बसस्थानकाची इमारत झाली नाही. आणि येथे बसस्थानकाची इमारत व्हावी म्हणून लक्ष्मणरावजी शक्करगे यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन आयुष्यभर लढा दिला. हिमायतनगर तालुका व्हावा, गावात डांबरी रस्ते व्हावेत म्हणूनही या भागात आलेल्या मंत्र्यांना त्यांनी वारंवार निवेदने दिली. लढे दिले.
हदगाव, हिमायतनगर तालुक्यातील लहान लहान गावचे नेते आमदार झाले, कोणी केंद्रीय मंत्रीही झाले परंतु हिमायतनगर हे मोठे व आज तालुक्याचे गाव असूनही या गावातील एकाही नेत्याला आमदारकी लाभली नाही हे दुर्दैव होय. खरेतर भाई विठ्ठलरावजी शिंदे, भाई लक्ष्मणराव शक्करगे, नरहरी लुटे यांना ही संधी लाभायला हवी होती…
हिमायतनगर येथे प्रसिद्ध असे परमेश्वर मंदिर आहे! या संस्थानच्या कमेटीवर संचालक म्हणूनही लक्ष्मणरावजी शक्करगे हे होते. मंदिर व परिसराचा विकास करण्यात आणि येथील महिनाभर चालणारी यात्रा यांचे सुंदर, नेटके व्यवस्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. मंदिराची आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठीही त्यांनी उत्तम कार्य केले. गावातील कोणत्याही सामाजिक, धार्मिक व कोणाच्या घरचे लग्नसोहळे, मिरवणुका यांमध्ये त्यांची प्रेरणादायी उपस्थिती आवर्जून असायची.
एक विनम्र माणूस म्हणूनही ते मोठे होते. सर्वांच्या ह्रदयात होते. त्यांच्या जाण्याने जणू आपले ह्रदयच कोणी काढून नेले की काय असे वाटायला लागलेय…! त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
लेखक….दत्ता डांगे, संवाद संपर्क क्र. ९८९००९९५४१