हिमायतनगर (वाढोणा), अनिल मादसवार| सन २०२६-२७ या वर्षात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने बांधकाम व्यवसाय ठप्प झाला असून, बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक बांधकाम कामगाराला ₹३० हजारांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी हिमायतनगर तालुक्यातील बांधकाम कामगारांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरड्या दुष्काळामुळे बांधकामाची कामे बंद पडली आहेत. परिणामी रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या बांधकाम कामगारांच्या हाताला काम मिळत नसून, त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगाराअभावी कामगार आर्थिक संकटात सापडले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.


प्रत्येक कामगाराला ३० हजारांची मदत देण्याची मागणी
दुष्काळी परिस्थितीचा विचार करून शासनाने बांधकाम कामगारांना आर्थिक मदत जाहीर करावी. प्रत्येक पात्र बांधकाम कामगाराला ३० हजार रुपये मदत देऊन त्यांना या संकटातून दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दुष्काळाच्या काळात रोजगार उपलब्ध नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले असल्याचेही कामगारांनी निदर्शनास आणून दिले.



या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, नांदेड, खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे बांधकाम कामगारांच्या या मागणीकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कोणती भूमिका घेतात, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.

या निवेदनावर नथुराम दामाजी कांबळे, शंकर मारोती काळे, धोंडोपंत बनसोडे, संजय देवराव कांबळे, संजय पुंजारा पवार, दासा गणपत कांबळे, अनिल उत्तम कांबळे, राजू मारोती कांबळे, गणेश मारोती काळे, संजय सखाराम काळे आणि राहुल देवराव कांबळे यांच्यासह बांधकाम कामगारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बांधकाम कामगारांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळणार का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
