घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत सुरू असलेल्या या दुर्गामाता दौडीमध्ये धारकऱ्यांसह युवक उत्साहाने सहभागी होत आहेत. पहाटेच्या शांत वातावरणात निघणाऱ्या या दौडीमुळे भक्ती, शौर्य, संस्कार आणि राष्ट्रभक्तीचा संदेश समाजापर्यंत पोहोचत आहे. दौडीचे शहरातील विविध ठिकाणी नागरिकांकडून उत्साहात स्वागत केले जात असून, या उपक्रमाला दिवसेंदिवस विशेष महत्त्व प्राप्त होत आहे.


आई जगदंबेचा जयघोष अन् भगव्या ध्वजांचा अभिमान! दररोज पहाटे ५ वाजता महिषासुरमर्दिनी माता कालिंका मंदिरातून दुर्गामाता दौडीला प्रारंभ होतो. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करीत ही दौड श्री परमेश्वर मंदिरात पोहोचते. तेथे प्रार्थना आणि आरतीने दौडीचा समारोप होतो. दौडीदरम्यान आई जगदंबेचा जयघोष, ‘जय श्रीराम’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी वातावरण भक्तिमय होते.

भगव्या ध्वजांसह शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी होणाऱ्या धारकऱ्यांचा उत्साह नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. धार्मिक श्रद्धेबरोबरच हिंदू धर्मसंस्कृतीचे जतन, ऐतिहासिक परंपरांचे स्मरण आणि नव्या पिढीमध्ये संस्कारांची रुजवणूक करण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.


धर्मसंस्कृती, संघटन आणि राष्ट्रभक्तीचा जागर – दुर्गामाता दौड हा केवळ पहाटेचा व्यायाम किंवा सामूहिक संचलन नसून, युवकांमध्ये शिस्त, संघटनभावना, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा निर्माण करणारा उपक्रम म्हणून पाहिला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या विचारांचे स्मरण करीत समाजात सांस्कृतिक जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे.

दौडीच्या स्वागतासाठी नागरिकही उत्स्फूर्तपणे पुढे येत असून, वाढोणा शहरातील धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाला वेगळीच रंगत आली आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आई जगदंबेच्या भक्तीचा जागर आणि हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणांचा संगम या दौडीच्या माध्यमातून अनुभवायला मिळत आहे.




विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर उत्साह शिगेला – नवरात्रोत्सवाचा समारोप विजयादशमीला होणार असल्याने दुर्गामाता दौडीच्या अंतिम टप्प्यात उत्साह अधिकच वाढला आहे. श्रद्धा, शौर्य, संस्कार आणि एकतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे वाढोणा परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. आई जगदंबेच्या जयघोषातून धर्मसंस्कृतीचा अभिमान जागवणारी ही दुर्गामाता दौड म्हणजे वाढोण्याच्या सांस्कृतिक परंपरेतील उत्साहपूर्ण पर्व ठरत आहे. यात युवक बालगोपाल महिला व ज्येष्ठ नागरिक ही सहभागी होत आहेत.


