हिमायतनगर, अनिल मादसवार| श्रावण महिन्यात श्री परमेश्वर मंदिर देवस्थान, वाढोणा–हिमायतनगर येथे आयोजित धार्मिक कथामहोत्सवात दररोज उपस्थित राहून निस्वार्थ भावनेने सेवा करणाऱ्या भाविकांच्या भक्तीला अनोखी भेट देण्यात आली आहे. श्री परमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने या सेवाभावी भाविकांमधून लकी ड्रॉ पद्धतीने निवड करण्यात आलेल्या ५० भाग्यवान भाविकांना मोफत अयोध्या, काशी तीर्थयात्रेची संधी देण्यात आली आहे.

या तीर्थयात्रेची बस सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता हिमायतनगर येथून भक्तिमय वातावरणात रवाना झाली. यावेळी श्री परमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरशेठ श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अक्कलवाड सर, परमेश्वर ट्रस्टचे संचालक अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, डॉ. राजेंद्र वानखेडे, नगरसेवक सुभाष बल्पेलवाड, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, रामराव सूर्यवंशी, रमेश पळशीकर, बाळू अण्णा चवरे, संतोष पळशीकर, पापा शिंदे, दिगंबर वानखेडे, रामभाऊ ठाकरे, उदय देशपांडे, मारोती हेंद्रे, राम सूर्यवंशी, प्रवीण कोमावार, मारोती लुमदे, संतोष मुद्देवाड, श्याम जाक्कलवाड, गंगाधर बासेवाड, साहेबराव अष्टकर, पापा पार्डीकर, रामराव पाटील, यांच्यासह शहरातील प्रमुख मान्यवर, नागरिक आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते तीर्थयात्रेच्या बसचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर नारळ फोडून भाविकांना मंगलमय प्रवासासाठी शुभेच्छा देत बस तीर्थयात्रेसाठी रवाना करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनी ‘हर हर महादेव’, ‘श्री परमेश्वर महाराज की जय’ अशा जयघोषाने परिसर भक्तिमय करून सोडला. दि. २८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ही तीर्थयात्रा पार पडणार असून, यात्रेदरम्यान भाविकांना काशी, अयोध्या, उज्जैन, सिहोर, शेगाव, रामटेक, औंढा नागनाथ यांसह विविध पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेता येणार आहे.

श्रावण महिन्यात मंदिरातील धार्मिक कार्यक्रमात सेवा करणाऱ्या भाविकांचा सन्मान करत त्यांना देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचे मोफत दर्शन घडवून आणण्याचा हा उपक्रम भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम ठरत आहे. मंदिर ट्रस्टच्या या उपक्रमाचे ज्येष्ठ नागरिक, भाविक आणि शहरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी महावीरशेठ श्रीश्रीमाळ यांनी तीर्थयात्रेस रवाना झालेल्या सर्व भाविकांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. भाविकांचा प्रवास सुखकर आणि मंगलमय व्हावा, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.



