नांदेड, प्रतिनिधी| मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके संकटात सापडली असून शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी विभागासह सर्व संबंधित यंत्रणांनी केवळ बैठका आणि अहवालांपुरते मर्यादित न राहता समन्वयाने आणि तातडीने काम करावे, असे स्पष्ट निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.


दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. जिल्हानिहाय पाऊस, पिकांची स्थिती आणि निर्माण झालेल्या अडचणींची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी सादर केली.


दरम्यान, वीजपुरवठ्याचा प्रश्न शेतकऱ्यांसाठी आणखी डोकेदुखी ठरू नये, यासाठी ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी राज्यात सध्या विजेचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यात लोडशेडिंग होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.



बैठकीचे प्रास्ताविक कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी केले. लातूर व छत्रपती संभाजीनगर विभागाच्या कृषी सहसंचालकांसह संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा सादर केला.

बैठकीस नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार, परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जालना जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, छत्रपती संभाजीनगरचे अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकिणे यांच्यासह विविध जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आता बैठकीतील निर्देश प्रत्यक्ष शेताच्या बांधावर किती वेगाने पोहोचतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत, वीजपुरवठा आणि पिकांच्या नुकसानीबाबत ठोस निर्णयाची अपेक्षा आहे.

