नांदेड/भोकर /हिमायतनगर प्रतिनिधी| भोकर-नांदेड मार्गावरील खाजगी प्रवासी वाहतुकीचा बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सिताखांडी परिसरात टाटा मॅजिक आणि ट्रकची भीषण धडक होऊन झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू, तर चार जण गंभीर अवस्थेत मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून, ‘आता तरी प्रशासनाचे डोळे उघडणार का?’ असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.


या मार्गावर काही दिवसांपूर्वीही टाटा मॅजिकचा अपघात झाला होता. त्यामुळे वारंवार होणारे अपघात हा केवळ योगायोग नसून खाजगी प्रवासी वाहतुकीतील बेफिकिरी, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, भरधाव वेग आणि नियमांकडे होणारे दुर्लक्ष याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.


जास्तीत जास्त फेऱ्या मारून अधिक कमाई करण्याच्या स्पर्धेत काही वाहनचालकांकडून वेगाची मर्यादा ओलांडली जात असल्याचा आरोप आहे. टाटा मॅजिकसारख्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबले जात असल्यास अपघाताच्या वेळी जीवितहानीचा धोका अनेकपटींनी वाढतो. प्रवाशांचा जीव हा कोणत्याही वाहनधारकाच्या कमाईपेक्षा महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनधारकाने नियमांचे पालन करणे ही केवळ कायदेशीर नव्हे, तर नैतिक जबाबदारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.




‘दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांना लगाम घाला’ या मार्गावर अचानक तपासणी मोहीम राबवून चालकांची ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी करावी, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर परवाना निलंबनासह कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
प्रवाशांनी क्षमतेपेक्षा जास्त भरलेल्या वाहनात बसणे टाळावे. चालक भरधाव वेगाने वाहन चालवत असेल, मोबाईलवर बोलत असेल किंवा नशेत असल्याचा संशय आल्यास त्याला जाब विचारून प्रवास टाळावा. शक्य असेल तेथे सुरक्षित आणि अधिकृत सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
RTO आणि पोलिस प्रशासनाला थेट सवाल भोकर-नांदेड मार्गावर नियमित वाहन तपासणी होते का? क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेणाऱ्या वाहनांवर किती कारवाया झाल्या? नशेत वाहन चालविणाऱ्यांची तपासणी किती वेळा झाली? अनधिकृत प्रवासी वाहतूक केंद्रांवर कारवाई का होत नाही? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने जनतेसमोर ठेवण्याची वेळ आली आहे.
सिताखांडी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले ११ जण ही केवळ आकडेवारी नाही. ती ११ कुटुंबांची माणसे, आधार आणि भविष्य होते. एका अपघातानंतर काही दिवस शोक व्यक्त करून पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ राहिली, तर पुढचा अपघात कधी आणि कुठे होईल, याची शाश्वती नाही.
“हा लढा कोणत्याही व्यवसायाच्या विरोधात नाही; तो मानवी जीवाच्या रक्षणासाठी आहे. व्यवसाय करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र दुसऱ्याच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही,” अशी भूमिका भाजप तालुका उपाध्यक्ष विकास विक्रम कळकेकर यांनी मांडली. आता प्रशासनाने केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कारवाई करावी, अन्यथा ‘भोकर-नांदेड रस्ता की मृत्यूचा सापळा?’ हा सवाल जनतेच्या मनात कायम राहणार आहे.

