मानाच्या बैलजोडीची दिमाखदार मिरवणूक – सायंकाळी चार वाजता श्री परमेश्वर मंदिरापासून नगरपंचायतीच्या मानाच्या बैलजोडीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब, श्री परमेश्वर मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, नगरपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, मान्यवर आणि मोठ्या संख्येने शेतकरी या मिरवणुकीत सहभागी झाले.

ढोल-ताशांचा दणदणाट, पारंपरिक वेशभूषा आणि सजविलेल्या बैलजोड्या यामुळे शहरातील वातावरण अक्षरशः पोळामय झाले. मिरवणूक दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या मैदानात पोहोचल्यानंतर सर्वांचे लक्ष लागले होते ते मानाच्या बैलजोडीच्या विवाह सोहळ्याकडे.



४.५० वाजता मंगलाष्टकांचा गजर – ठरलेल्या सायंकाळी ४ वाजून ५० मिनिटांच्या शुभमुहूर्तावर मानाच्या बैलजोडीचा पारंपरिक विवाह सोहळा थाटात पार पडला. पुरोहित गजू गुरु वाळके यांच्या मधुर वाणीतून पाच मंगलाष्टकांचा गजर झाला आणि उपस्थित शेतकरी बांधवांनी या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याचा उत्साह अनुभवला. शहरातील शेकडो शेतकरी आपल्या सर्जा-राजाला घेऊन या सोहळ्यात सहभागी झाले होते. विवाह सोहळा संपताच बैलांची मिरवणूक पुन्हा जोमाने निघाली आणि सर्जा-राजा आपल्या मालकाच्या घराकडे रवाना झाला.


सर्जा-राजाची पूजा; पुरणपोळीचा नैवेद्य – घरी पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोडीचे विधिवत पूजन करून आरती केली. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत बळीराजाने आपल्या खऱ्या सहकाऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

यंदाच्या अल्प पावसाच्या संकटातून शेतकरी आणि शेतीला लवकरच उभारी मिळावी, शेतात पुन्हा हिरवाई नांदावी आणि यंदाची सुगी सुख-समृद्धी, भरभराट व धनधान्य घेऊन यावी, अशी प्रार्थना प्रत्येक शेतकरी कुटुंबातून करण्यात आली. दरम्यान, नगरपंचायतीच्या वतीने बैलपोळ्या निमित्त पुरणपोळीच्या जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. या सामूहिक भोजनाने बैलपोळा उत्सवाची सांगता झाली.




