नांदेड, प्रतिनिधी| नांदेड रेल्वे मंडळातील रेल्वे कॉलनी तसेच रेल्वे स्थानक परिसरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी रेल्वेच्या वैद्यकीय विभागाच्या नियोजनातून विशेष मोहीम राबविण्यात आली. मुख्य वैद्यकीय अधीक्षक, नांदेड मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य आरोग्य निरीक्षकांनी नांदेड महानगरपालिकेच्या सहकार्याने ही कारवाई केली.



रेल्वे कॉलनीतील रहिवासी आणि प्रवाशांकडून भटक्या कुत्र्यांबाबत तक्रारी व विनंत्या प्राप्त झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने नांदेड महानगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर महानगरपालिकेच्या डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून रेल्वे कॉलनी आणि स्थानक परिसरात फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली.



२१ व २४ ऑगस्ट रोजी विशेष कारवाई – दि. २१ आणि २४ ऑगस्ट रोजी मंडळ रेल्वे व्यवस्थापक (DRM) कार्यालय तसेच त्यास लागून असलेल्या रेल्वे कॉलनी परिसरात विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी अनेक भटक्या कुत्र्यांना पकडण्यात आले. त्यामध्ये काही आक्रमक व धोकादायक कुत्र्यांचाही समावेश होता.



भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी नसबंदी आणि लसीकरणाची कार्यवाहीही करण्यात आली. पकडलेल्या कुत्र्यांचे योग्य व्यवस्थापन व पुनर्वसन करण्यात आल्याने रेल्वे कर्मचारी, कॉलनीतील रहिवासी तसेच नागरिकांना या समस्येपासून दिलासा मिळण्यास मदत झाली.

अन्नकचरा उघड्यावर न टाकण्याचे आवाहन – भटक्या कुत्र्यांची संख्या व वावर नियंत्रित करण्यासाठी केवळ कारवाई न करता नागरिकांच्या सहभागाचीही गरज असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रेल्वे कॉलनीतील रहिवाशांनी घरातील अन्नकचरा अथवा खाद्यपदार्थ उघड्यावर किंवा रस्त्याच्या कडेला टाकू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच रेल्वे स्थानकावरील कॅन्टीन चालकांनाही अन्नकचरा इतरत्र न टाकता त्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे परिसरातील स्वच्छता राखण्यासोबतच भटक्या कुत्र्यांचा वावर आणि संख्या नियंत्रित करण्यास मदत होणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या या विशेष मोहिमेचे रेल्वे कॉलनीतील रहिवासी, कर्मचारी आणि नागरिकांनी स्वागत केले असून, वैद्यकीय विभागाच्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

