नांदेड, अनिल मादसवार| आदिवासीबहुल किनवट तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत शासनाच्या विकास योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचला पाहिजे. पेसा अंतर्गत उपलब्ध निधी वेळेत, पारदर्शकपणे आणि गुणवत्तापूर्ण विकासकामांसाठी खर्च करून आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासाला गती द्यावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी दिले.


मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महेश पाटील यांनी किनवट तालुक्याचा दौरा करत पंचायत समितीत जवळपास दोन तास विविध विभागांच्या कामांचा सखोल आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, डी. बी. गीरी, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.



बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना, व्हीबी-जी-रामजी योजना, पेसा, कर वसुली, शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायतींच्या विविध विकास योजनांचा आढावा घेण्यात आला. शाळा व अंगणवाड्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे, तसेच १५ व १६ व्या वित्त आयोगाच्या निधीतून वीज व सौरऊर्जा सुविधा उभारण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पेसा अंतर्गत मंजूर निधी वेळेत खर्च करून विकासकामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे आदेश देताना विकासकामांमध्ये अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.




सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन नियम-२०२६ ची प्रभावी अंमलबजावणी करून प्रत्येक ग्रामपंचायतीत कचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन काटेकोरपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. घरकुल, स्वच्छ भारत अभियान, कर वसुली आणि इतर योजनांची उद्दिष्टे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
स्मशानभूमीसाठी जागेचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्या-बरोबरच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियमित क्षेत्रभेटी घेऊन आदिवासी भागातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळेल यासाठी काम करण्याचे आवाहन सीईओ महेश पाटील यांनी केले.

घरकुलांची पाहणी; हिमायतनगर पंचायत समितीलाही भेट
आढावा बैठकीनंतर सीईओ महेश पाटील यांनी बोधडी (बु.) येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सुरू असलेल्या घरकुलांची पाहणी करून लाभार्थ्यांशी संवाद साधला. तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रस्तावित वसतिगृहाच्या जागेची पाहणी केली. त्यानंतर जलधारा येथे सुरू असलेल्या पशुवैद्यकीय अधिकारी कार्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. कामाच्या गुणवत्तेबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी तातडीने गुणवत्ता तपासणीचे आदेश दिले. दौऱ्यादरम्यान त्यांनी पंचायत समिती, हिमायतनगर येथेही भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या.

वेळेत हजर राहा; अन्यथा कारवाई
शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक असून विनापरवानगी गैरहजर राहणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी दिला.

