हिमायतनगर,अनिल मादसवार | हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणांबाबत नागरिकांकडून सातत्याने होत असलेल्या तक्रारींची दखल घेत नगरपंचायत प्रशासनाने सोमवारी (दि. ३ ऑगस्ट) पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. या कारवाईमुळे शहरातील मुख्य रस्ते मोकळे होऊन वाहतुकीला दिलासा मिळाला. मात्र, या मोहिमेचा सर्वाधिक फटका हातावर पोट असलेल्या फेरीवाले, हातगाडे चालक आणि छोट्या व्यावसायिकांना बसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.


नगरपंचायतीने सुमारे सहा महिन्यांपूर्वी व्यापारी, फेरीवाले आणि हातगाडेधारकांना ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देत अतिक्रमण स्वखुशीने हटविण्याचे आवाहन केले होते. काहींना नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. मात्र, दरम्यान विधान परिषद निवडणूक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकांमुळे ही मोहीम स्थगित करण्यात आली होती.


निवडणुका संपल्यानंतर प्रशासनाने पुन्हा कारवाईला सुरुवात केली. उमर चौक, श्री परमेश्वर मंदिर रस्ता कमान, परमेश्वर मंदिर परिसर, पळसापूर कॉर्नर ते चौपाटीपर्यंत रस्त्यालगत करण्यात आलेली अतिक्रमणे हटविण्यात आली. या कारवाईत अनेक हातगाडे, तात्पुरती दुकाने आणि फेरीवाल्यांची व्यवसायाची ठिकाणे हटविण्यात आली.



कारवाईनंतर संतप्त फेरीवाले आणि हातगाडे चालकांनी नगरपंचायतीकडे पुनर्वसनाची मागणी केली. “आम्ही अतिक्रमणाचे समर्थन करत नाही; मात्र आमच्या उदरनिर्वाहासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून न देता थेट कारवाई करणे अन्यायकारक आहे. नगरपंचायतीने अधिकृत फेरीवाला झोन अथवा नियोजित जागा उपलब्ध करून द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली.
एकीकडे शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिक्रमण हटविणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे. तर दुसरीकडे पुनर्वसनाची व्यवस्था न करता झालेल्या कारवाईमुळे गरीब आणि लहान व्यावसायिकांच्या उपजीविकेवर परिणाम झाल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे अतिक्रमण हटावासोबतच फेरीवाल्यांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

ही अतिक्रमण हटाव मोहीम मुख्याधिकारी गौरव वांडेकर आणि पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी कार्यालयीन अधीक्षक राहुल बोकारे, अभियंता नरेश काटकर, विठ्ठल शिंदे, ज्ञानेश्वर चिंते, बालाजी हार्डपकर, पोलीस उपनिरीक्षक शेख यांच्यासह नगरपंचायत व पोलीस प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कारवाईमुळे हिमायतनगर शहरातील प्रमुख रस्ते अतिक्रमणमुक्त झाल्याने वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत झाली असून, पुढील टप्प्यातही अशाच प्रकारची मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

