नांदेड, प्रतिनिधी| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने विनातिकीट व अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी तसेच रेल्वे महसुलाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने 31 जुलै 2026 रोजी विशेष ‘मॅसिव्ह तिकीट तपासणी अभियान’ राबविले. या अभियानात 339 विनातिकीट व अनियमित प्रवासाची प्रकरणे आढळून आली असून संबंधित प्रवाशांकडून एकूण ₹2 लाख 33 हजार 300 इतका दंड वसूल करण्यात आला.


सकाळी 5 ते रात्री 8.30 या कालावधीत सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक शैलेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. अभियानात नांदेड विभागातील 24 रेल्वे गाड्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 28 तिकीट तपासणी कर्मचारी तसेच रेल्वे सुरक्षा दल (RPF) कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.


तपासणीदरम्यान 226 विनातिकीट प्रवास (TWT) प्रकरणांतून ₹2,00,685, 20 अनियमित प्रवास (IRT) प्रकरणांतून ₹15,815 आणि 93 बुक न केलेले सामान (UBL) प्रकरणांतून ₹16,800 असा एकूण ₹2,33,300 महसूल रेल्वे प्रशासनाने वसूल केला.




रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वैध तिकीट किंवा योग्य प्रवास प्राधिकरणासहच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. वैध तिकीटधारक प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी व विनाअडथळा प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच रेल्वे महसुलाचे संरक्षण करण्यासाठी अशा विशेष तिकीट तपासणी मोहिमा भविष्यातही नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

