हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा येथे कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून तिन्ही लहान मुले आई-वडिलांविना पोरकी झाली आहेत.


मृत दाम्पत्याची ओळख पायल विनोद राठोड (वय ३५) आणि विनोद रंगराव राठोड (वय ४०) अशी झाली आहे. हे दाम्पत्य धारजणी फुलवाडी तांडा (ता. भोकर) येथील रहिवासी असून नातेवाईकांच्या लग्नासाठी बोरगडी तांडा येथे आले होते.


प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास पतीने पत्नीला घराबाहेर नेऊन धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत तिचा मृत्यू झाला. त्यानंतर सकाळी धानोरा शिवारातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पतीचा मृतदेह आढळून आला.



घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. या प्रकरणामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत.
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी वैजंने, पोलिस निरीक्षक अमोल भगत तसेच स्थानिक पोलिस कर्मचारी उपस्थित होते. या दुहेरी मृत्यूच्या घटनेमुळे बोरगडी तांडा परिसरात शोककळा पसरली आहे.
